जळगावात आर.आर.शाळेच्या मुख्याध्यापकांना धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:08 PM2018-06-15T23:08:55+5:302018-06-16T12:43:04+5:30
ईस्ट खानदेश इज्युकेशन सोसासयटी संचलित आर. आर. विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापक डी़एस़सरोदे यांच्यासह ६७ शिक्षकांना संस्थाचालकांच्या माणसांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर रोखून शाळेत प्रवेश देण्यास मज्जाव केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी ६़४० वाजेच्या सुमारास घडला़
जळगाव- ईस्ट खानदेश इज्युकेशन सोसासयटी संचलित आर. आर. विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापक डी़एस़सरोदे यांच्यासह ६७ शिक्षकांना संस्थाचालकांच्या माणसांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर रोखून शाळेत प्रवेश देण्यास मज्जाव केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी ६़४० वाजेच्या सुमारास घडला़ यावेळी तरूणांनी सरोदे यांना धक्काबुक्की केल्याचाही प्रकार घडला़ त्यामुळे दुपारी मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला ठिय्या मांडून तक्रार दिली़ त्यानुसार संस्थाचालक अरविंद लाठी, प्रभारी अध्यक्ष दिलीप लाठी, योगेश झनके, दिलीप सोनवणे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या घटनेबाबत शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी दिलेलली माहिती अशी की, शुक्रवारी शाळेचा पहिला दिवस म्हणून आऱआऱ विद्यालयात प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडणार होता़ त्यामुळे सकाळी ६़४० वाजता मुख्याध्यापक सरोदे यांच्यासह शिक्षक पालक व विद्यार्थी शाळेजवळ पोहोचले़ विद्यालयाच्या मागील बाजूस नेहमीप्रमाणे प्रवेश करत असताना त्यांना ते प्रवेशद्वार बंद दिसले़ दुसरे प्रवेशद्वार देखील बंद होते़ अखेर मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करणार तोच संस्थाचलकाच्या तीन माणसांनी रोखले़ तुम्हाला विद्यालयात प्रवेश न करू देण्याचे संस्थाचालक अरविंद लाठी, प्रभारी अध्यक्ष दिलीप लाठी, चिटणीस मुकूंद लाठी, सदस्य विजय लाठी यांनी सांगितले असल्याचे मुख्याध्यापकांना सांगितले़. प्रवेश नाकारताच मुख्याध्यापक सरोदे यांच्यासह शिक्षकांशी त्या तरूणांचा वाद झाला़ या गोंधळात त्या तिघांनी मुख्याध्यापकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप शिक्षकांनी केला.