जळगाव शहरासाठी आणखी १०० कोटी रुपये - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:31 PM2019-08-24T12:31:49+5:302019-08-24T12:33:57+5:30

गाळे प्रश्नाला मात्र बगल

Rs 5 crore more for Jalgaon city - Chief Minister Devendra Fadnavis announced | जळगाव शहरासाठी आणखी १०० कोटी रुपये - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

जळगाव शहरासाठी आणखी १०० कोटी रुपये - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Next

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जळगाव महापालिकेच्या हुडको कर्जाचा प्रश्न मार्गी लावत राज्य सरकारने जळगावला कर्जमुक्त केले आहे. सोबतच या पूर्वी येथील रस्त्यांच्या कामासाठी दिलेल्या १०० कोटीनंतर आता आणखी १०० कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाजनादेश यात्रेदरम्यान केली. शहरातील व्यापाऱ्यांचा जिव्हाळ््याचा विषय असलेल्या गाळ््याप्रश्नाबाबत एकही शब्द न बोलता त्यास बगल दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसºया टप्प्यात शुक्रवारी दुपारी ३.५५ वाजता ही यात्रा जळगावात पोहचली. त्या वेळी झालेल्या सभेप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदूलाल पटेल, माजी आमदार गुरुमुख जगवानी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, ‘बेटी बचाव बेटी पढाओ’चे संयोजक डॉ. राजेंद्र फडके, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) डॉ. संजीव पाटील, सुजीत ठाकूर, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्वीन सोनवणे, जि.प.चे शिक्षण सभापती पोपट भोळे, समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, मनपातील भाजप गटनेते भगत बालाणी, सभागृह नेते ललित कोल्हे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, महिला व बालकल्याण सभापती मंगला चौधरी आदी उपस्थित होते.
खडसेंसह मुख्यमंत्र्यांना पुष्पहार घालून स्वागत
सभेच्या सुरुवातीला आमदार भोळे यांनी महाराष्ट्राचा नकाशा असलेले व ‘तुम्हीच परत येणार’ असा उल्लेख असलेले भव्य स्मृतीचिन्ह देऊन तर महापौर सीमा भोळे यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. तसेच मुख्यमंत्री, महाजन, खडसे व भोळे यांना एकच पुष्पहार घालून मनपाच्या कर्जमुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला.
मराठा समाजाच्यावतीने सत्कार
मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्यावतीने तसेच धनगर समाजाच्यावतीनेही मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच तिहेरी तलाकचा निर्णय घेतल्याबद्दल मुस्लीम महिला आणि प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला.
गाळ््यांचा प्रश्न मार्गी लावा - आमदार सुरेश भोळे
प्रास्ताविक भाषणात आमदार सुरेश भोळे यांनी हुडको कर्जाचा प्रश्न मार्गी लावला आता मनपाचा गाळ््याचा प्रश्नही मार्गी लावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच रेडीरेकनरचे दर कमी करावे, गाळ््यांचा लिलाव रद्द करावा, अशीही मागणी केली. १९८०नंतर प्रथमच जळगाव मतदार संघात भाजपला संधी दिल्याने येथे ९०० कोटींचा निधी आणून विकास करता, असेही आमदार भोळे यांनी नमूद केले. ज्याप्रमाणे ३७० कलम रद्द करून देशवासीयांना दिलासा मिळाला, त्याचप्रमाणे मनपाला हुडकोच्या कर्जातून कर्जमुक्त केल्याने जळगाववासीयांना दिलासा मिळाला असल्याचे भोळे म्हणाले.
थोडे काय, भरपूर मागा...
जळगावातील रस्त्यासाठी या पूर्वी सरकारने १०० कोटी दिले होते. आता आमदार भोळे म्हणतात, आणखी थोडे द्या. अहो थोडे काय भरपूर मागा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी आमदार भोळे यांना देत या पूर्वी दिलेल्या १०० कोटीतून ५० टक्के कामे झाल्याचा दाखला द्या, रस्त्यासाठी आणखी १०० कोटी देतो, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी देऊन टाकली. हुडकोच्या कर्जातून मनपाला मुक्त केलेच आहे, आता जळगावला गतवैभव मिळवून द्यायचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
खान्देशातील प्रकल्पांना हजारो कोटी दिले
पूर्वीच्या आघाडी सरकारकडून खान्देशकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र युती सरकारने खान्देशातील प्रकल्पांना हजारो कोटी रुपये दिले असून जळगाव शहराच्या विकासासाठीही मोठा निधी दिल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.
विरोधक बुद्धू मुलासारखे
निवडणुकीतील पराभवामुळे विरोधक ईव्हीएमवर टीका करतात. ईव्हीएमला विरोध करण्यापेक्षा मतदारांच्या मनात घर करा, तर मते मिळतील, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला. या सोबतच काँग्रेस-राष्ट्रवादी हे बुद्धू मुलासारखे आहेत. परीक्षेत नापास झाल्यास माझा पेन खराब असे सांगत पेनला दोष देतात. तशीच अवस्था विरोधकांची झाली असून स्वत:च्या चुकांमुळे पराभव होत असताना ते ईव्हीएमला विरोध करीत असल्याची टीका केली. सत्तेत असताना सत्तेचा माज येऊन त्यांनी स्वत:ची संस्थाने भरण्याची कामे केली. आता विरोधात असले तरी तेच काम करीत आहे. त्यामुळे चांगले विरोधकही होऊ शकले नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मतदारांच्या दर्शनासाठी महाजनादेश यात्रा
महाजनादेश यात्रेवर विरोधक टीका करीत यात्रा कशाला काढली, दैवतासाठी यात्रा काढतात, असे म्हणतात. आमचे दैवत मतदार, जनता हेच असल्याने त्यांच्या दर्शनासाठी ही यात्रा काढल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी राज्यात रस्ते, पाणीयोजना, आरोग्य, शिक्षण, घरकूल, महिलांसाठीच्या योजना,मराठा समाज आरक्षण, धनगर समाजाचा प्रश्न, तिहेरी तलाक, कलम ३७० या विषयीदेखील माहिती दिली.
गाळे विषयावर बोलणे टाळले
या सभेत जळगावातील मनपाच्या गाळ््यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आमदार सुरेश भोळे यांनी केली होती. सोबतच गिरीश महाजन यांनीही हा मुद्दा मांडला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी भाषणात हा विषय टाळला.
पूरग्रस्तांना मदत
यावेळी पूरग्रस्तांसाठी आमदार सुरेश भोळे यांनी एक लाख ५१ हजार रुपये तर महापौर सीमा भोळे यांनी एक लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षांचा प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा नीला चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.
माहिती पुस्तिकेचे प्रकाशन, डॉक्टरांचा सत्कार
या वेळी नेत्रविकार माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या सोबतच उत्कृष्ट कामगिरीबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. हेमंत पाटील, डॉ. अनिल खडके, डॉ. राहुल महाजन, डॉ. रितेश पाटील, डॉ. गीतांजली ठाकूर, डॉ. नीलेश चांडक, डॉ.मनीष चौधरी, तंत्रज्ज्ञ पांडुरंग अल्हाट, बाळासाहेब कुमावत यांचा सत्कार करण्यात आला.
महिना-दोन महिन्यात गाळे प्रश्न मार्गी लागणार
वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जळगावला निधी आणत मनपाला हुडको कर्जातून मुक्त केले आहे. आता मनपाच्या गाळ््यांचा प्रश्नही महिना-दोन महिन्यात मार्गी लागेल, असे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले. या सोबतच मेडिकल, हब, पाडळसरे सह इतर प्रकल्पांना दिलेल्या निधीसह राज्य सरकारने केलेल्या विविध कामांची माहिती दिली.
आगळे-वेगळे जळगाव तयार होईल
शहरासाठी मोठा निधी आणला जात असून अमृत योजना, भूमीगत गटारी यांचे कामे सुरू आहे. या कामांमुळे रस्ते खराब असले तरी हे कामे झाले की, चांगले रस्ते तयार करून तसेच सर्व सुविधा देऊन आगळे-वेगळे जळगाव साकारणार असल्याचे महाजन म्हणाले.
विरोधकांची जनाजा यात्रा
विरोधक महाजनादेश यात्रेवर टीका करीत असले तरी या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता ही महाजनादेश यात्रा आहे तर विरोधक काढत असलेली यात्रा म्हणजे जनाजा यात्रा आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तोंडे पहायला कोणी तयार नसल्याने त्यांच्या यात्रांनाही प्रतिसाद मिळत नसल्याचे महाजन म्हणाले. दूरचित्रवाणीवरील कलावंत व आता दोन महिन्यांपूर्वी निवडून आलेला खासदारांना घेऊन राष्ट्रवादीवाले यात्रा काढत आहे, त्यांनाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे महाजन म्हणाले. सोबतच नाना पटोले यात्रा काढायला निघाले तर त्यांच्याच पक्षातील मंडळींनी त्यांना विरोध केल्याचे महाजन म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीत शेवटची धाकधुकी बाकी
काँग्रेस सध्या व्हेंटीलेटरवर असून राष्ट्रवादीची वाईट अवस्था आहे, असे महाजन म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीत शेवटची धाकधुकी बाकी असल्याचे सांगत आम्ही लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांंदा उमेदवार बदलवूनही विजय मिळवून दाखविल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

Web Title: Rs 5 crore more for Jalgaon city - Chief Minister Devendra Fadnavis announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव