दहशतवादाविरुद्ध लढण्यास संघ असमर्थ : ब्रिगेडिअर सुधीर सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 05:12 PM2018-02-14T17:12:31+5:302018-02-14T17:16:48+5:30
अजित पवारांना वाचविण्यासाठी शरद पवारांचा भाजपला पाठिंबा दिल्याची जळगावात केली टीका
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१४ : सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याबद्दल वक्तव्य करून सैन्याचा घोर अपमान केला असून याबद्दल त्यांचा निषेध करीत आहे. तीन दिवसात सैन्य उभे करण्याची भाषा करणारे भागवत हे खेळण्यातील बंदुकीसाठी फिट असून दहशदवादाविरुद्ध लढण्यास ते असमर्थ आहेत, अशी टीका आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रमुख ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी त्यांच्यावर केली आहे.
पक्षाची संघटन स्थिती, तयारी व पक्षाच्यावतीने २३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान जळगाव येथे होणाºया नैसर्गिक (अध्यात्मिक) शेती प्रशिक्षण शिबिराच्या पार्श्वभूमीवर ब्रिगेडिअर सावंत हे १४ रोजी जळगाव येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आघाडी तसेच युती सरकारवर वेगवेगळे आरोप केले.
राफेल विमान घोटाळा बोफोर्सपेक्षा मोठा
राफेल विमान घोटाळा कोट्यवधींचा असून तो बोफोर्स घोटाळ््यापेक्षा मोठा आहे, असा आरोप या वेळी ब्रिगेडिअर सावंत यांनी केला. ते म्हणाले हा करार काँग्रेस सरकारने केला होता. यात १२६ विमान खरेदीचा करार असताना प्रत्यक्षात केवळ ३६ विमाने आली व तीदेखील तीन पट किंमतीने खरेदी करण्यात आले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी यांना पॅरीसला घेऊन गेले व कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता तेथे अंबानींना ठेका देण्यात आला. यात लष्काराच्या गुप्ततेच्या नियमांचाही मोदींनी भंग केला असून एकप्रकारे त्यांनी देशद्रोहच केल्याचा आरोप सावंत यांनी केला. यामध्ये राहुल गांधी केवळ बोलतात, मात्र यात ते मोदींचे नाव घेत नाही, असे सांगून त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाना साधला.
शरद पवार यांच्या पाठिंब्यावर भाजपा सरकार उभे
राजकारणात शरद पवार यांच्यासारखा दुटप्पी माणूस मी पाहिलेला नाही. ४० वर्षे संविधान तुडविले व तेच संविधान बचाव म्हणत रॅली काढत आहे, अशी टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली. अजित पवार यांना वाचविण्यासाठी शरद पवार यांनी भाजपा सरकारला पाठिंबा दिला असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.