उद्यापासून आरटीई प्रवेशप्रक्रिया प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:12+5:302021-06-10T04:12:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला येत्या शुक्रवारपासून (दि. ११) प्रारंभ होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला येत्या शुक्रवारपासून (दि. ११) प्रारंभ होत आहे. पालकांना पाल्याच्या प्रवेश निश्चितीसाठी २० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिले जातात. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशासाठी अर्ज मागवून लॉटरी काढण्यात आली. मात्र प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेला कोरोनामुळे सुरुवात करण्यात आली नव्हती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे ही प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
२६९५ बालकांची निवड
जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांतील तीन हजार ६५ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी जिल्हाभरातून पाच हजार ९३९ पालकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोन हजार ६९५ बालकांची पहिल्या फेरीमध्ये निवड झाली आहे. त्यामुळे लॉटरीतून प्रवेश मिळालेल्या पालकांनी अर्जासोबत जोडलेले कागदपत्र घेऊन शाळेत दिलेल्या मुदतीत जायचे आहे.
अंतराची होणार पडताळणी
ज्या बालकांना लॉटरी लागली आहे, अशा बालकांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश करावयाचा आहे. तसेच प्रवेशाच्या तारखासुद्धा संकेस्थळावर कळविण्यात येणार आहेत. दरम्यान, शाळा व निवासी पत्त्याच्या अंतराचीदेखील पडताळणी केली जाणार आहे. जर त्यात अंतर चुकीचे आढळून आले तर तात्पुरते प्रवेश रद्द केले जाणार आहेत.
दूरध्वनी, ई-मेलद्वारे शाळेशी साधता येईल संपर्क
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या पालकांना दिलेल्या मुदतीत आपल्या पाल्याचा प्रवेश शाळेत जाऊन करणे शक्य होणार नाही, अशा पालकांनी दूरध्वनी वा ई-मेलद्वारे शाळेशी संपर्क साधून प्रवेशाची कार्यवाही करता येईल. निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.