आरटीओ-विभाग नियंत्रकात कलगीतुरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 05:37 PM2018-11-07T17:37:10+5:302018-11-07T17:43:16+5:30
एस.टी.बसेसचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या कारणावरुन जळगावमध्ये सध्या डेप्युटी आरटीओ जयंत पाटील व एस.टी.चे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. एरव्ही नेहमीच राजकारणात रंगणारा कलगीतुरा सरकारी अधिका-यांमध्येही रंगू लागल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
सुनील पाटील
जळगाव : एस.टी.बसेसचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या कारणावरुन जळगावमध्ये सध्या डेप्युटी आरटीओ जयंत पाटील व एस.टी.चे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. एरव्ही नेहमीच राजकारणात रंगणारा कलगीतुरा सरकारी अधिका-यांमध्येही रंगू लागल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. दोन्ही अधिकारी एकाच विभागाचे मात्र उपभाग असलेल्या विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख आहेत. यानिमित्ताने दोन्ही विभागांमध्ये काय चालते याची माहिती न सांगता जनतेला मिळू लागली आहे. जिल्ह्यात अवैध वाहतूक करणा-या वाहनधारकांकडून आरटीओ हप्ते घेतात, हे खुद्द एस.टी.चे विभाग प्रमुख सांगतात, तर अवैध प्रवाशी वाहतुक करणारे वाहन जप्त केल्यानंतर एस.टी.आवारात लावण्यास एस.टी.च्या अधिका-यांनी विरोध केला, त्यामुळे अवैध वाहतुक कोणाला हवी व कोणाला नको यावरुन स्पष्ट होत असल्याचे जयंत पाटील यांचे म्हणणे आहे. दोघांच्या आरोपात किती तथ्य आहे व वस्तुस्थिती काय आहे हे दोघांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. दुसरा मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो, तो म्हणजे अवैध प्रवाशी वाहतूक करणारे जप्त केलेल्या वाहनांना जागा न दिल्यानेच आरटीओंनी कारवाईचा बडगा उगारला हा आरोप होत आहे, याचा अर्थ असाही होतो की, यापूर्वी एस.टी.च्या बसेसला काही नियमांमधून वगळले जात असावे किंवा त्याकडे कानाडोळ केला जात असावा. एस.टी.असो की अन्य खासगी प्रवाशी वाहतूक करणारे वाहन हे व्यावसायिक असल्याने दोघांना नियम सारखाच लागू आहे, मग डोळेझाक कशी केली जाते? असा प्रश्न उपस्थित होतो. एकाच बापाचे दोन लेकरे असल्याने आपसातील उणेदुणे काढू नका अशा शब्दात पालकत्वाची भूमिका निभावणाºया परिवहन मंत्र्यांनी दोन्ही अधिका-यांना समज दिली आहे. यानिमित्ताने दोन्ही विभागातील चुकीच्या बाबी प्रकर्षाने जनतेसमोर आल्या आहेत. आपल्या विभागात भ्रष्टाचार नाही असे दोघांपैकी एकही अधिकारी छातीठोकपणे सांगू शकत नाही. त्यामुळे संयम बाळगणे हेच दोघांसाठी अधिक फायद्याचे आहे.