आरटीओच्या अधिकाऱ्यांनी पकडले ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:17 PM2019-01-25T12:17:11+5:302019-01-25T12:17:27+5:30

चालकाचे पलायन

The RTO officials caught the tractor | आरटीओच्या अधिकाऱ्यांनी पकडले ट्रॅक्टर

आरटीओच्या अधिकाऱ्यांनी पकडले ट्रॅक्टर

googlenewsNext
ठळक मुद्दे डी.पी.अ‍ॅक्टनुसार दुसरा गुन्हा दाखल



जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओचे पथक मध्यरात्री रिक्षा, दुचाकीचा वापर करुन साध्या वेशात रस्त्यावर उतरले होते. या पथकाने कानळदा रस्त्यावरील के.सी.पार्क परिसरात पहाटे तीन वाजता विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले. पथकाला पाहून चालकाने ट्रॅक्टर जागेवरच सोडून पलायन केले. दरम्यान, याप्रकरणी आरटीओने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ कलम ३ अन्वये फिर्याद देवून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. याआधी नशिराबाद पोलिसात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
अवैध वाळू व वाहतुकीबाबत महसूल, पोलीस व आरटीओ असे तिन्ही विभागांनी कारवाईसाठी स्वतंत्रपणे पथके नेमली आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी बुधवारी रात्री वाहन निरीक्षक कमलेश चव्हाण, महेश देशमुख, रणजीत पाटील व दीपक साळुंखे यांचे पथक तयार केले होते. एक अधिकारी दुचाकीवर, दोन अधिकारी रिक्षाने तर एक जण खासगी कारने या भागात गेले होते. हे पथक पहाटे तीन वाजता कानळदा रस्त्यावर विना क्रमांकाचे वाळूचे ट्रॅक्टर अडविले असता चालकाने ट्रॅक्टरवरुन उडी मारुन पोबारा केला.
चेसीस क्रमांकावरुन शोधला मालक
चालक पळून गेल्यानंतर पथकाने हे ट्रॅक्टर स्वत:चालवून शहर पोलीस स्टेशनला लावले. क्रमांक नसल्याने ट्रॅक्टरचा चेसीस क्रमांक घेऊन गुरुवारी ट्रॅक्टरचा क्रमांक (क्र.एम.एच.१९ सी.व्ही.०५५६) निष्पन्न झाला. त्यानंतर मालक निष्पन्न झाला. राहूल सुरेश सपकाळे (रा.धामणगाव, ता.जळगाव) या व्यक्तीच्या नावावर हे ट्रॅक्टर आहे.
आता नव्या कायद्याचा वापर
वाळू प्रकरणात दंडात्मक कारवाईसोबतच आरटीओने आता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ कलम ३ अन्वये (डी.पी.अ‍ॅक्ट) गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला गुन्हा नशिराबादला आरटीओनेच दाखल केला आहे तर शहर पोलीस स्टेशनला हा दुसरा गुन्हा असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. वाळू वाहतूक रोखण्यासाठी आरटीओचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: The RTO officials caught the tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.