दिवाळीत आरटीओचा वाॅच : ११ वाहनांना ५७ हजारांचा दंड
By विलास बारी | Published: November 18, 2023 09:26 PM2023-11-18T21:26:55+5:302023-11-18T21:27:14+5:30
दिवाळीत ११ खासगी वाहनांवर कारवाई
जळगाव: दिवाळीच्या काळात पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह विविध मार्गांवर जादा भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून वाॅच ठेवण्यात आला. या काळात ११ वाहनांना ५७ हजार ५०० रुपयांचा दंड जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आला.
आरटीओची तीन पथके
दिवाळीच्या काळात प्रवाशांकडून जास्तीचे भाडे घेणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने ६० ते ७० खासगी वाहनांची तपासणी केली.
दिवाळीत ११ खासगी वाहनांवर कारवाई
जास्तीचे भाडे घेतल्याप्रकरणी आरटीओ कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाली नसली तरी वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली.
कोणत्या कारणासाठी केला दंड?
दिवाळीच्या काळात जळगाव आरटीओ कार्यालयाने एसटी भाड्याच्या दीडपट भाडे आकारणीबाबतची सवलत खासगी प्रवासी वाहनांना दिली होती. त्यापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्याबाबत तक्रार आली नाही.
पथकाने केलेल्या तपासणीत काही वाहनांमध्ये मालवाहतूक केल्याचे आढळून आले. तर काही वाहनांमधून जादा प्रवासी वाहतूक करण्यात आल्याचे पथकाला आढळून आले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
दिवाळीच्या काळात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून जादा भाडे आकारणीची तक्रार आली नाही. मात्र तीन पथकांच्या माध्यमातून खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्यात ११ वाहनधारकांकडून ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.-श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी