अन्य जिल्ह्यात खटला चालवा
By admin | Published: January 22, 2017 12:24 AM2017-01-22T00:24:44+5:302017-01-22T00:24:44+5:30
मनोज लोहार यांची मागणी : लोहार यांची न्यायालयात उपस्थिती
जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा जळगावात असलेला प्रभाव व मनोज लोहार यांना जीभ व घशाचा असलेला कॅन्सर यामुळे जळगावातील खटला अन्य जिल्ह्यात किंवा मुंबईत चालवावा अशी मागणी करुन लोहार यांच्या वकीलांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. तर त्यांच्या या अर्जावर सरकार पक्षाने हरकत घेत अर्ज नामंजूर करण्याची मागणी केली. दोन्ही पक्षाकडून दीड तास युक्तीवाद झाला. यावेळी लोहार स्वत: न्यायालयात उपस्थित होते.
माजी जि.प. सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलीस स्टेशनला तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक लोहार यांच्याविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात हा खटला सुरु आहे. लोहार आपल्या वकीलांसह शनिवारी न्यायालयात हजर झाले. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके तर लोहार यांच्यावतीने अॅड.केदार भुसारी व अॅड.सतीश वाणी (नाशिक) यांनी काम पाहिले. 25 जानेवारी रोजी कामकाज होणार आहे.
सरकारी वकील म्हटले आरोग्याचे कारण खोटे
न्यायालयात कामकाज समोर आलेल्या कागदपत्रांवर चालते. या खटल्याचा निकाल चार महिन्यात लावण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, आरोग्याचे कारण खोटे आहे. खटला लांबविण्यासाठी लोहार यांच्याकडून काहीही आरोप केले जात आहेत.
364 अ हे कलम खडसेंमुळे लागले-लोहार
जळगावात एकनाथराव खडसे यांचा प्रभाव आहे. तसेच कॅन्सरचा आजार असल्याने माङया समक्ष खटला चालावा म्हणून हा खटला जळगावबाहेर किंवा शक्यतो मुंबईत चालवावा असे लोहार यांचे म्हणणे आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना खडसे यांनी विरोधी पक्षनेते असताना या प्रकरणात 364 अ हे कलम लावण्याचे पत्र त्यांनी सरकारकडे दिले आहे. त्यामुळे जळगावात ते प्रभाव टाकू शकतात. लोहार आजारी असताना त्यांच्याविरुध्द पकड वारंट काढले गेले. दरम्यान, खडसेंच्या पत्रव्यवहाराचे कागदपत्रेही वकीलांनी न्यायालयात सादर केले.