ताशी ११० वेगाने इंजिन चालवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:31 AM2021-02-21T04:31:37+5:302021-02-21T04:31:37+5:30
जळगाव : गेल्या वर्षी जळगाव ते भादली या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून, या मार्गावरून नियमित रेल्वे ...
जळगाव : गेल्या वर्षी जळगाव ते भादली या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून, या मार्गावरून नियमित रेल्वे धावण्यासाठी शनिवारी भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे या मार्गाची चाचणी करण्यात आली. यासाठी ताशी ११० किलोमीटर वेगाने इंजिन चालवून, रूळांची तपासणी करण्यात आली.
रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनामुळे रखडलेल्या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यात आली असून, एप्रिलपासून जळगाव ते भादली मार्गावरून नियमित रेल्वे धावण्याचे उदिष्ट ठेवले आहे. यासाठी या मार्गावरील सिंग्नल यंत्रणा व विद्युत यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम ठप्प्यात आले आहे. तत्पूर्वी या मार्गावरून भविष्यात विनाअडथळा रेल्वे गाड्या धावण्यासाठी शनिवारी इंजिन चालवून चाचणी घेण्यात आली. चाचणीसाठी डिझेलच्या इंजिनाचा वापर करण्यात आला. सकाळी अकरापासून ते सायंकाळी पाचपर्यंत जळगाव ते भादली या अकरा किलोमीटरच्या दरम्यान ही चाचणी घेण्यात आली.
इन्फो :
ताशी ११० वेगाने चालविले इंजिन
भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार मुख्य अभियंता सुधीर पटेल, उपमुख्य अभियंता पंकज ढावरे, कार्यकारी अभियंता राहुल अग्रवाल, तांत्रिक अभियंता ब्रजेश कुमार आदी अधिकाऱ्यांनी ही चाचणी घेतली. भादली ते जळगावदरम्यान टाकण्यात आलेल्या रेल्वे मार्गावर टप्प्याटप्प्याने इंजिनाचा वेग वाढवून चाचणी घेण्यात आली. सुमारे ताशी ११० किलोमीटरपर्यंत इंजिनाचा वेग वाढवून चाचणी घेण्यात आली असल्याचे ढावरे यांनी सांगितले. या चाचणीनंतर रेल्वे रुळांचीही तपासणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असल्याचेही थावरे यांनी सांगितले.