भुसावळात गॅस सिलिंडरच्या रिक्षाचे टायर फुटल्याने धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 03:28 PM2018-10-02T15:28:27+5:302018-10-02T15:31:48+5:30
यावल रोडवर मालवाहू रिक्षामध्ये गॅस सिलेंडरच्या भरलेल्या रिक्षा जात असताना रिक्षाचा टायर अचानक फुटला व यामुळे मोठा आवाज आला. सुदैवाने स्पार्किंगसारखा कोणताही प्रकार न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
भुसावळ : येथील यावल रोडवर मालवाहू रिक्षामध्ये गॅस सिलेंडरच्या भरलेल्या रिक्षा जात असताना रिक्षाचा टायर अचानक फुटला व यामुळे मोठा आवाज आला. सुदैवाने स्पार्किंगसारखा कोणताही प्रकार न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात आलेले होते. बाहेर पोलिसांचा बंदोबस्त फौजफाटा असताना त्याचवेळी अचानक जोरदार स्फोट होण्यासारखा आवाज आल्यानंतर सर्वत्र एकच धावपळ सुरु झाली.
आवाज नेमका आला कुठून? हे समजत नव्हते. काही वेळानंतर अमित गॅस एजन्सीचा मालवाहू रिक्षात भरलेले सिलेंडर घेऊन जात असताना त्याचा अचानक टायर फुटला व त्याचाच हा आवाज आहे, हे लक्षात आल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पालकमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी विश्रामगृहाच्या प्रवेश द्वारासमोर बंदोबस्तासाठी उभे असलेले आरसीपी प्लाटूनचे कमांडो यांच्या लक्षात आल्यावर रिक्षातील वाहक हा आटापिटा करून एकेक हंडी रस्त्याच्या कडेला घाबरल्या स्थितीत नेत होता. तेव्हा कमांडोंनी माणुसकी दाखवत रिक्षाचालकास मदत केली व सर्व सिलेंडर रस्त्याच्या कडेला केले.