चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार रुपयांनी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:04 PM2019-06-28T12:04:55+5:302019-06-28T12:05:52+5:30
कृत्रिम भाववाढीस लगाम
जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सराफ व्यवसायात दलाल सक्रीय झाल्याने सोन्या-चांदीच्या भावात झालेल्या कृत्रिम भाववाढीस लगाम बसू लागला असून चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचे भाव ४० हजार ५०० रुपयांवरून ३९ हजार ५०० रुपयांवर आले आहेत. सोन्याच्याही भावात आठवडाभरापासून चढ-उतार सुरू असून दोन दिवसांपूर्वी ३४ हजार ५०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचलेल्या सोन्याच्या भावात २०० रुपयांनी घसरण होऊन ते गुरुवारी ३४ हजार ३०० रुपये प्रती तोळ््यावर आले आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने-चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यानुसार आताही आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण, इराक व अमेरिका यांच्यातील तणावाच्या स्थितीचा फायदा घेत सराफ व्यवसायात दलाल सक्रीय झाल्याने गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. यात १९ जून रोजी ३३ हजार ३०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात एकाच दिवसात ७०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले होते. तसेच २२ जून रोजी ३९ हजार रुपये प्रती किलो असलेल्या चांदीच्या भावात वाढ होऊन ती ४० हजार ५०० रुपये प्रती किलोवर पोहचली होती.
तणावाचा परिणाम नाही
दलालांच्या सक्रीयतेमुळे सोने-चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे लक्षात येताच आंतरराष्ट्रीय पातळीवर सराफ बाजार भाववाढीतून सावरु लागला व या कृत्रिम भाववाढीस लगाम बसत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारतातही भाव कमी होत आहेत. या सोबतच इराण, इराक व अमेरिका यांच्यात तणावाची स्थिती असली तरी ब्राझील, स्पेन, जर्मनी, लंडन, येथून येणाऱ्या चांदीच्या भावावर परिणाम झालेला नाही. त्यामुळे चांदीचे भाव पूर्व स्थितीवर येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
औद्योगिक मागणी घटली
सध्या लग्न तिथीही जास्त नसल्याने सोने-चांदीच्या मागणीवर परिणाम होत आहे. सोबतच औद्योगिक मागणीदेखील कमी झाल्याने मोठ्या व्यापारी व उद्योजकांनी चांदी खरेदीत हात आखडता घेतला आहे. त्यामुळे वरील दोन्ही कारणांनी मागणी कमी होत असल्यानेही चांदीचे भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.
या सर्वांचा परिणाम होत असल्याने चांदीचे भाव एकाच दिवसात हजार रुपयांनी घसरून ३९ हजार ५०० रुपयांवर आल्याचे जाणकारांनी सांगितले.
सोन्याचेही भाव होताहेत कमी
कृत्रिम भाववाढीमुळे सोन्याने ३४ हजाराच्या पुढे झेप घेतली होती. यात २० रोजी ३४ हजार रुपये प्रती तोळा असलेल्या सोन्याचे भाव २१ रोजी ३४ हजार २०० रुपये प्रती तोळा, २२ रोजी ३४ हजार ४०० रुपये प्रती तोळा, २५ रोजी ३४ हजार ५०० रुपये प्रती तोळा असे वाढत गेले. मात्र ही भाववाढदेखील थांबून २६ रोजी सोने ३४ हजार ३०० रुपये प्रती तोळ््यावर आले व २७ रोजीदेखील त्याच भावावर ते कायम होते.
गेल्या वर्षी ४१ हजाराच्या पुढे गेली होती चांदी
गेल्या वर्षी अधिक मासामुळे चांदीला मागणी वाढून ५ जून २०१८ रोजी चांदी ४१ हजार ८०० रुपयांवर पोहचली होती. त्यानंतर मागणी कमी झाल्याने भावात घसरण झाली व २० जून २०१८ रोजी ४१ हजार ५०० रुपयांवर आणि त्यानंतर २१ जून २०१८ रोजी थेट एक हजार रुपयांची घसरण झाली व चांदी ४० हजार ५०० रुपयांवर आली होती. या वर्षीदेखील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांदीच्या भावात एक हजार रुपये प्रती किलोने घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कृत्रिमरित्या वाढलेल्या भाववाढीस आळा बसल्याने चांदीचे भाव कमी झाले आहे. सोन्याचेही भाव नियंत्रणात येत आहेत. येत्या १५ दिवसात सर्व स्थिती पूर्वपदावर येईल.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.