रुपयांतील अस्थिरतेने सोने-चांदीत चढ-उतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:20 PM2019-06-01T12:20:02+5:302019-06-01T12:20:34+5:30
लग्नसराईमुळे सोन्याला मागणी कायम
जळगाव : डॉलरच्या तुलनेत रुपयांचे दर कमी जास्त होत असल्याने सोने-चांदीतही अस्थिरता निर्माण झाली असून त्यांचे भाव सातत्याने कमी जास्त होत आहे. मे महिन्यात तर ३२ हजार १०० तर कधी ३२ हजार ९०० रुपयांवर पोहचलेल्या सोन्याच्या भावात सतत चढ-उतार दिसून आला. चांदीला मागणी नसल्याने आठवडाभरात चांदीचे भाव ५०० रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत.
सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर शेअर बाजार कोसळत आहे तर मुंबई शेअर बाजारात उत्साह असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम होण्यासह डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांचे दर कमी जास्त होत असल्याने त्याचा सोने-चांदीवर परिणाम होत आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुपयांचे दर बदलत आहे. सध्या एका डॉलरचा दर कधी ७० रुपये तर ६९ तर कधी त्यापेक्षा वाढत आहे. यामुळे सोने-चांदीही अस्थिर झाले आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीच्या दिवशी सोने १०० रुपयांनी कमी होऊन ३२ हजार १०० रुपयांवर आले होते. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवसापासून दररोज भाववाढ होत गेली. लग्नसराईमुळे या मागणीत मोठी भर पडत असून सुवर्णनगरी जळगावातील सुवर्णपेढ्या गर्दीने गजबजून गेल्या आहेत. ७ मे रोजी ३२ हजार १०० रुपये प्रती तोळा असलेले सोने ८ रोजी ३२ हजार २०० रुपये प्रती तोळा, ९ रोजी ३२ हजार ३०० रुपये प्रती तोळा अशी वाढ होऊन १४ रोजी ते ३२ हजार ९०० रुपयांवर पोहचले. १५ रोजी यात १०० रुपयांनी घसरण होऊन ते ३२ हजार ८०० रुपयांवर आले. त्या नंतर २० रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ७४ पैशांनी सुधारणा होऊन ७०.३४ रुपयांवर असलेल्या अमेरिकन डॉलरचे भाव ६९.६० रुपयांवर आले. याचा परिणाम म्हणून सोनेही एकाच दिवसात ३०० रुपये प्रती तोळ््याने घसरून ३२ हजार ६०० रुपयांवरून ३२ हजार ३०० रुपयांवर आले. या पाठोपाठ २३ रोजी ६९.६४ रुपये असलेले अमेरिकन डॉलरचे भाव २४ रोजी ६९.५२ रुपयांवर आले. याचा परिणाम म्हणून सोनेही एकाच दिवसात १०० रुपये प्रती तोळ््याने घसरून ३२ हजार ३०० रुपयांवरून ३२ हजार २०० रुपयांवर आले. त्यानंतर रुपयात घसरण होत जाऊन २८ रोजी डॉरलचे भाव ६९.६५ रुपये, २९ रोजी ६९.८२ रुपये झाल्याने सोन्याचे भाव वाढत जाऊन ते पुन्हा ३२ हजार ६०० रुपयांवर गेले आहे.
चांदीत ५०० रुपयांनी घसरण
सोन्या सोबतच चांदीतही अस्थिरता आहे. गेल्या आठवड्यात चांदी ५०० रुपये प्रती किलोने कमी होऊन ती ३८ हजार ५०० रुपयांवरून ३८ हजार रुपये प्रती किलोवर आली. ३१ रोजीदेखील चांदी ३८ हजार रुपये प्रती किलोवर कायम आहे.
लग्नसराईमुळे सध्या सोन्याला चांगली मागणी आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांतील चढ-उतार यामुळे सोन्याच्या भावावर परिणाम होत आहे.
- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.