ग्रामीण भागात पबजी गेम ठरतोय जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 03:42 PM2019-05-31T15:42:55+5:302019-05-31T15:43:01+5:30
पालकांमध्ये चिंता : विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय हिंसक वृत्ती
पळासखेडे बुद्रुक, ता.जामनेर : सद्यस्थितीला पबजी या मोबाईल गेमने विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या व्यक्तींना वेड लावले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंसकवृत्ती निर्माण होत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.
स्मार्ट फोनवर पबजी या मोबाईल गेमने लहान पासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच वेड लावले आहे. या गेमचे फॅड आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील तरूणाई सोबतच अल्पवयीन मुले या जिवघेण्या खेळाच्या आहारी गेले आहे. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होऊन विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडेपणा व हिंसक प्रवृत्ती बळावत असल्याने पालकवर्ग चिंतेत आहे.
स्पर्धेच्या युगात वावरताना झटापट काम उरकण्यासाठी व संपर्कासाठी अलीकडे मोबाईल सह इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. तसाच त्याचा गैरवापर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. नवनवीन मोबाईल गेममुळे तरूण पिढी कामधंदा सोडून तर विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मोबाईल गेम खेळण्यात दंग झाले आहे. मोबाईल गेममधील पबजी नावाच्या गेमने तर देशात धुमाकूळ घातला आहे.
भारतासह जगभरात या गेमने मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. सतत अपडेट होत असलेल्या या गेममध्ये विविध प्रकारे बदल होत असल्याने हा गेम खेळण्यास अनेक जण उत्सुक होतात. मात्र त्याचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. या खेळाच्या नादात अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागत आहे.
मागील काही दिवसांमध्ये सोशल मीडिया वर टिकटॉक शॉर्ट व्हिडिओने चांगलेच थैमान घातले आहे. याचा गैरवापर होऊन अश्लील व्हिडिओ, मॅसेज पाठविले जात असल्याने शासनाने टिकटॉक अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या पबजी गेमचा लहान मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याने या गेमवर तातडीने बंदी घालावी अशी मागणी पालकांकडून होत आहे. @
असा खेळला जातो पबजी गेम
पॅराशूटद्वारे १०० खेळाडूंना एका आयलॅडवर उतरविले जाते. त्या ठिकाणी खेळाडूंना बंदूक शोधून शत्रूंना टिपावे लागते. शेवटी जो वाचेल तो विजयी ठरतो. हा गेम गृप बनवून ही खेळता येतो. शेवटपर्यंत पोहचल्यानंतर सर्व जण विजयी ठरतात. या गेमला डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल मध्ये दोन जिबीची स्पेस आवश्यक असते.