‘अमृत’च्या वरच्या वर दबाई केलेल्या खड्ड्यात रुतला ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST2021-07-08T04:13:17+5:302021-07-08T04:13:17+5:30
भुसावळ : अमृत योजना डोकेदुखी ठरू पाहत असून अमृत योजनेच्या अंतर्गत टाकल्या जाणाऱ्या जलवाहिनीनंतर व्यवस्थित दबाई होत नसल्याने ...

‘अमृत’च्या वरच्या वर दबाई केलेल्या खड्ड्यात रुतला ट्रक
भुसावळ : अमृत योजना डोकेदुखी ठरू पाहत असून अमृत योजनेच्या अंतर्गत टाकल्या जाणाऱ्या जलवाहिनीनंतर व्यवस्थित दबाई होत नसल्याने विठ्ठल मंदिर वॉर्डात रस्ते कॉंक्रिटीकरण करण्यासाठी खडी आणत असलेला ट्रक बुधवारी चक्क अमृत योजनेच्या खड्ड्यात रुतला. तसेच पुढे याच योजनेच्या कामामुळे जलवाहिनी फुटल्यामुळे शुद्ध पाण्याची नासाडी होत असून पाणी रस्त्यावर वाहत होते.
शहरातील बहुतांशी अंतर्गत रस्त्याचे सध्या खडीकरण व कॉंक्रिटीकरण सुरू आहे. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर शहरातील अंतर्गत रस्त्यांनी कात टाकली आहे. रस्ते कॉंक्रिटीकरण करण्यासाठी विठ्ठल मंदिर वॉर्डात खडीने भरलेला ट्रक गांधी चौकातून येत असताना त्या ठिकाणी अमृत योजना व केबल टाकण्यासाठी खोदलेले खड्डे हे इस्टिमेटप्रमाणे न भरल्याने वरच्या वरच बुजविल्यामुळे गिट्टीने भरलेला अर्धा डम्पर खड्ड्यामध्ये रुतला. यामुळे सकाळच्या वेळेस येथील व्यावसायिकांची मोठी डोकेदुखी वाढली होती. तसेच वाहतुकीलाही मोठी अडचण निर्माण झाली होती. तसेच याच मार्गावर पुढे अमृत योजनेमुळे जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे शुद्ध पाणी संपूर्ण रस्त्यावर पसरले गेले आहे. आधीच शहरांमध्ये आठ ते दहा दिवसांआड पाणी येत असताना अमृत योजनेच्या ढिसाळ नियोजनामुळे जलवाहिनी फुटण्याचे काम नित्याचे झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, रुतलेला डम्पर दीड ते दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर क्रेन बोलावून काढण्यात आला. असेच काही प्रकार गेल्या आठ दिवसांत जाममोहल्ला भाग, खडका रोड परिसर या ठिकाणी झाले होते. या ठिकाणीही जड वाहने ही अमृत योजनेच्या व्यवस्थित न बुजविलेल्या खड्ड्यांमध्ये रुतली होती.
जलवाहिनी टाकल्यानंतर रस्ते व्यवस्थित बुजवावेत
अमृत योजनेअंतर्गत शहरातील प्रत्येक मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यामध्ये जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी जलवाहिनी टाकल्यानंतर रस्ते व्यवस्थित न बुजविणे व प्रेस दबाई करणे आवश्यक असताना अनेक ठिकाणी फक्त वरच्यावर खड्डे बुजविले गेल्याचे लक्षात येत आहे. अशा प्रकारामुळे भविष्यात पक्के रस्ते झाल्यानंतर अमृत योजनेच्या टाकलेल्या जलवाहिनीला गळती झाल्यास हे रस्ते पुन्हा खोदावे लागल्यास आश्चर्य वाटायला नको.