सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डची गोळी झाडून आत्महत्या; कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 05:34 AM2024-05-16T05:34:57+5:302024-05-16T05:36:23+5:30
एक वर्षापासून ते स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये प्रतिनियुक्तीवर सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव/जामनेर : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्डने बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास जामनेर येथील राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
प्रकाश गोविंदा कापडे (३९) असे मृताचे नाव आहे. ते १५ वर्षांपासून राज्य राखीव पोलिस दल मुंबई येथे कार्यरत होते. एक वर्षापासून ते स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये प्रतिनियुक्तीवर सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. चार दिवसांपूर्वी मतदानासाठी ते जामनेरला आले होते. त्यांच्या रिव्हॉल्व्हरमध्ये दहा गोळ्या होत्या. त्यातील दोन गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली.