पराकोटीचा त्याग, निरंतर संघर्षाचे प्रतीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:50+5:302021-06-09T04:20:50+5:30
महाराणा प्रताप यांच्या संघर्षातील वेगळेपण : २० वर्षांपर्यंत मोगल साम्राज्य शाहीविरोधात सतत संघर्ष. बादशाह अकबराच्या सेनेशी १९ ...
महाराणा प्रताप यांच्या संघर्षातील वेगळेपण : २० वर्षांपर्यंत मोगल साम्राज्य शाहीविरोधात सतत संघर्ष. बादशाह अकबराच्या सेनेशी १९ मोठे व १४ लहान युद्धे करणारा अलौकिक योद्धा
लेखक- डॉ. नरसिंह परदेशी- बघेल, जळगाव
एन्ट्रो - भारताच्या इतिहासात अशी काही व्यक्तिमत्त्वे होऊन गेली आहेत की, कार्य-कर्तृत्वाचा प्रभाव हा केवळ तत्कालीन काळावरच नव्हे तर आजच्या पिढीवर सुद्धा उमटलेला आहे. अशा प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांमध्ये राणा प्रताप यांचा अगत्याने उल्लेख करावा लागेल. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य आणि संघर्षातील वेगळेपणावर हा एक प्रकाशझोत.
राजस्थानातील मेवाड राज्याचा कार्यभार सांभाळणाऱ्या राणाप्रताप यांना तत्कालीन सर्वांत प्रबळ व साम्राज्यवादी सम्राट बादशाह अकबराशी लढा द्यावा लागला. मात्र त्यांचा तो लढा मेवाडची स्वतंत्रता व सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी एका साम्राज्यवादी शक्तीच्या विरोधात होता.
परकियांच्या गुलामगिरीत वा वर्चस्वाखाली राहून स्वत:चे अस्तित्व संपवून त्यांच्या आदेशाचे पालन करणे हे राणाप्रताप यांच्या करारी स्वभावाला पटणारे नव्हते आणि म्हणूनच मोगल बादशहा अकबराने तब्बल चारवेळा पाठविलेला प्रस्ताव नाकारून मेवाडचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचा राणाप्रतापांचा निर्णय पुढे हळदी घाटीच्या युद्धास सामोरे जाण्यास बाध्य करणारा ठरला.
वस्तूत: दि.१८ जून १५७६ च्या हळदीघाटीच्या निर्णायक युद्धानंतर केवळ चार महिन्यांतच स्वत: बादशाह अकबर राणाप्रतापांना कैद करण्यासाठी मोठ्या सैन्यासह मेवाडवर चालून आला होता. इतकेच नव्हेतर पुढील चार वर्षांच्या कालावधीत बादशाह अकबराने इ.स. १५७७ ते १५७९ पर्यंत तीनवेळा त्यांचा प्रमुख सेनापती शाहबाजखान तद्नंतर अब्दुल रहिम खान, जगन्नाथ कच्छवाह यांना मेवाडवर अधिपत्य प्राप्ती साठी पाठविले असले तरी ३२० मैलाच्या क्षेत्रफळावर मोगलांना शेवटपर्यंत वर्चस्व स्थापित करता येऊ शकले
नाही. ही बादशाह अकबराच्या दृष्टीने नाचक्कीची बाब मानली गेली होती. हळदी घाटीच्या युद्धात निकराचा लढा देऊनही राणाप्रतापांना दुर्दैवाने त्यात पराभव पत्करावा लागला असला तरी या पराभवानंतरही ते खचले नव्हते. तद्नंतर त्यांनी जवळपास २० वर्षांपर्यंत मोगल साम्राज्यशाहीविरोधात सतत संघर्षरत राहून बादशाह अकबराच्या सेनेशी १९ मोठे व १४ लहान युद्धे केलीत. याकामी त्यांना पराकोटीचा त्याग, ऐश्वर्य, निरंतर संघर्ष व वनवास पत्करावा लागला. मात्र ते अखेरच्या श्वासापर्यंत मोगलांना शरण गेले नाहीत, यातच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख स्थापित झालेली आहे. राणाप्रताप यांच्या कार्यकाळातील अत्यंत महत्त्वाचे व निर्णायक युद्ध म्हणून हळदी घाटीचे युद्ध ओळखले जाते. असे असले तरी या युद्धानंतर मोगल सेनेच्या विरोधात राणाप्रतापांना सागाम, उंटाला, गंगाहर, लखा, खंडेल, खानल, मेलोवणी, पूर-मांडल, बाकरोल, डिंडोल, मावली, इंटाली, हिंता, ताणा, रवाड, सादडी आणि मेनार असे काही महत्त्वाची युद्धे ही लढावी लागली होती. इतकेच नव्हेतर हळदी घाटीच्या युद्धाइतकेच तोलामोलाचे मानले गेलेले, मात्र काही प्रमाणात दुर्लक्षित असलेले दिवेरचे युद्ध जिंकून राणा प्रताप यांनी मेवाड पुनर्प्राप्तीचा पाया घातला होता.
राणाप्रतापांनी दिवेरचे युद्ध हे पूर्णत: मानसशास्त्रीय पद्धतीने व शत्रूस्थितीचा सखोल आढावा घेऊन योग्य तयारीसह केले होते. याच युद्धानंतर मेवाडचे वैभव असणारा कुंभलगड राणा प्रतापांनी तलवारीचा एकही वार न करता निर्धोकपणे आपल्या अधिपत्याखाली आणला होता. त्यामुळे दिवेरचे युद्ध व त्यातील विजय हे राणाप्रतापांच्या कर्तृत्वाला एक वेगळी उंची देणारे ठरते. किंबहुना या ऐतिहासिक युद्धानंतर राणा प्रतापांनी पुन्हा एकदा मोगलांच्या अधिपत्याखाली गेलेला मेवाडचा प्रदेश जिंकून घेण्याची मुहूर्तमेढ रोवली होती. राणाप्रतापांचा या दीर्घकालीन संघर्षात त्यांनी मेवाडचे सार्वभौमत्व जपलेले असले तरी त्यांच्या या संघर्षाचे काही वेगळेपण ही जपण्याचा प्रयत्न केला होता.
गनिमी कावा पद्धतीचा अवलंब-
मध्ययुगीन कालखंडात मुख्यत: समोरासमोरील युद्धास प्राध्यान्य दिले जात असे. तत्काळात समोरासमोर युद्ध करणे हे एका अर्थाने शौर्य व वीरतेचे प्रतीक समजले जात होते. कालपरत्वे किल्ल्याच्या आत सुरक्षित राहून शत्रूशी लढा देण्याची पद्धत पुढे आली. त्या काळात किल्ले हे स्वत:च्या बचावाचे मुख्य साधन मानले जात असले तरी या दोन्ही प्रकारांत मेवाडी सैनिकांनाच अधिक हानी सहन करावी लागत असल्याची बाब लक्षात घेऊन महाराणा प्रताप यांनी या पारंपरिक युद्ध पद्धतींमध्ये बदल करीत गनिमी कावा या अभिनव युद्ध तंत्राचा अवलंब केला होता. हळदी घाटीच्या युद्धानंतर त्यांनी याच पद्धतीद्वारे केवळ शत्रूस नामोहरण करून त्यास हात टेकण्यास बाद्ध केल्याचे दिसून येते. दिवेरचे युद्ध हे याच पद्धतीचे होते.
बहुआयामी किवा पर्यायी नेतृत्वास संधी -
तत्कालीन काळात गड किंवा किल्ला शाबूत राखण्यावर अधिक भिस्त असे. काहीही झाले तरी किल्ला सोडायचा नाही, यादृष्टीने मेवाडचे नरेश सतत प्रयत्नशील असत. मात्र या नीतिमुळेच किल्ल्याच्या रक्षणार्थ लढताना काही नरेश व अनेक सैनिक धारातीर्थी पडल्याची काही उदाहरणे पुढे आलेली होती. परिणामी या नीतीवर पुन:र्विचार करीत राणा प्रतापांनी एकांगी नेतृत्व प्रणालीला फाटा देऊन बहुआयामी व पर्यायी नेतृत्व पुढे आणले होते. हल्दीघाटीच्या युद्धप्रसंगी राणाप्रतापांचे जिवंत राहाणे हे मेवाडच्या भवितव्यासाठी आवश्यक असल्याची बाब लक्षात येताच सर्व मेवाडी सरदारांच्या आग्रहावरून राणा प्रताप यांना रणांगण सोडावे लागले होते. तेव्हा त्यांनी मेवाडी सौनिकांना वाऱ्यावर न सोडता झाला मानसिंह यांच्या रूपाने मेवाडी सैनिकांना पर्यायी नेतृत्व उपलब्ध करून दिले होते. तद्वतच मोगल सेनानी शहाबाजखानने कुंभलगडावर केलेल्या आक्रमणाच्या वेळी शत्रू सैन्याकडून होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन राणा प्रतापांनी कुंभलगडाची जबाबदारी रावभान सोनगरा या पराक्रमी सेनानीवर सोपवून
गुप्तवाटेने ते कुंभलगडावरून बाहेर पडले होते. परिणामी प्रदीर्घ परिश्रमानंतर या किल्ल्यावर जेव्हा शाहबाजखानाचे वर्चस्व निर्माण झाले, त्यावेळी राणाप्रताप हे तेथे आढळून न आल्याने तो अत्यंत अस्वस्थ झाला होता. त्यामुळे त्यास पुन्हा राणाप्रताप यांच्या शोधासाठी अरवलीच्या दुर्गम भागात राणाप्रतापांचा शोध घेत फिरावे लागले होते. यावरून तत्कालीन काळात राजाने स्वत: किल्ल्यात राहून शत्रूशी लढा देत स्वत:चा व राजकुटुंबाचा व त्यातूनच पुढे राज्याचा सर्वनाश घडवून आणण्याच्या नितीत बदल करीत एखाद्या पराक्रमी सेनापतींवर किल्ल्याची जबाबदारी सोपवून अनावश्यक संहार रोखण्याचाही राणाप्रतापांनी प्रयत्न केला होता. हे यावरून स्पष्ट होण्यास मदत होते.
हळदीघाटीच्या युद्धानंतर ही मेवाडचे अधिपती म्हणून महाराणा प्रताप हेच कायम असल्याने परिणामी बादशाह अकबरास वारंवार राणाप्रताप यांच्याविरोधात सैन्यशक्ती पाठवावी लागली होती. त्यामुळे स्वत: किल्ला लढविण्याऐवजी पराक्रमी सरदारांवर किल्याची जबाबदारी सोपविण्याचा प्रकार म्हणजेच राणाप्रतापांच्या बदलत्या युद्धनीतीचाच भाग होता, असे म्हणावे लागते. राणा प्रतापांनी स्वत:चा बचाव करीत संघर्ष सुरू ठेवण्याकामी अनुसरलेली नीती जिंकू किंवा मरू या नीतीपेक्षा जास्त महत्त्वाची होती हे मानावेच लागते. (पूर्वार्ध)