व्यथा सोयगाव-शेंदुर्णी रस्त्याची कथा ठरली प्रसूतीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:42 PM2017-12-19T16:42:26+5:302017-12-19T17:01:01+5:30
खराब रस्त्यामुळे जळगाव ऐवजी शेंदुर्णीतील प्राथमिक रुग्णालयात केले उपचार
दीपक जाधव /आॅनलाईन लोकमत
शेंदुर्णी, ता.जामनेर, दि.१९ : राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिला. मात्र सोयगाव ते शेंदुर्णी या रस्त्याची दुरवस्था काही केल्या कमी झाली नाही. त्यातच प्रसूती वेदनांनी विव्हळणाºया विवाहितेला पुढील उपचारासाठी जळगाव येथे जाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. मात्र रस्त्यातील खड्डयांमुळे रस्त्यातच प्रसुती नको म्हणून नातेवाईकांनी शेंदुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्याचे धाडस दाखविले. या घटनेमुळे सोयगाव-शेंदुर्णी रस्त्याची व्यथा एका प्रसूतीची कथा ठरल्याचा अनुभव एका दाम्पत्याला आला.
सोयगाव तालुक्यातील वाडी येथील रहिवासी जाकीर खाँ गनिखाँ यांची पत्नी शमिनाबी जाकीर खॉ यांना १८ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. गावात बस नाही किंवा खाजगी गाडी नाही. त्यातच त्यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला आणि तत्काळ रुग्णवाहिका मदतीला धावली. वाडी गावातून रुग्णवाहीकेने ग्रामीण रूग्णालय सोयगाव येथे रुग्णाला आणले. याठिकाणी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन सपकाळ यांनी औषधोपचार सुरु केले. मात्र त्यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. रुग्णासह कुटुंबातील सदस्य, आरोग्य सेविका लक्ष्मी पवार, तालुका समुह संघटक अजय डोंगरे रुग्णवाहिकेसह जळगावला जाण्यासाठी निघाले.
रस्त्याचा विकास अडला २ जिवांवर नडला
सोयगाव ग्रामीण रुग्णालयातून निघालेली रुग्णवाहिका शेंदुर्णी पर्यंतच्या ७ किलोमिटरचा रस्ता चांगला नसल्याने रुग्णासह सर्वांनी जीव मुठीत धरत शेंदुर्णीत प्रवेश केला. प्रसूतीच्या वेदना पाहता अजय डोंगरे यांनी शेंदुर्णी प्रा.आ. केंद्रात दाखविण्याचे ठरविले. त्यानुसार शेंदुर्णी प्रा.आ.केंद्रातील पर्यवेक्षीका जयश्री पाटील व परिचारीका शोभा घाटे यांनी प्रसूतीची तयारी सुरु केली. प्रसूतीची पाचवी खेप असलेल्या शामिनाबी यांना मुलगा झाला. यापूर्वी त्यांना ३ मुली व एक मुलगा असे अपत्य आहे.
ग्रामीण रुग्णालयात झाले नाही ते प्राथमिक आरोग्य केंद्रात झाले.
प्रा.आ.केंद्र शेंदुर्णी येथे प्रसूतीसाठी रुग्ण आले, तेव्हा रात्रीचे ९ वाजून ४० मिनिटे झालेली होती. प्रसूती नैसर्गिक व सुखरूप झाली. मुलाचे वजन २ किलो ९०० ग्रॅम आहे. प्रसूतीनंतर पर्यवेक्षीका जयश्री पाटील यांनी रुग्ण व नातेवाईकाला रात्री थांबण्याचा सल्ला दिला.