सद्गुरु वाचोनि सापडेना सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:22 PM2019-07-01T12:22:12+5:302019-07-01T12:23:24+5:30
मनुष्य जीवन अमूल्य आहे याची तुलना दुसऱ्या कुठल्याही जीवनाची होऊ शकत नाही. मानवी शरीराची महिमा संत आणि ग्रंथांनी गायली ...
मनुष्य जीवन अमूल्य आहे याची तुलना दुसऱ्या कुठल्याही जीवनाची होऊ शकत नाही. मानवी शरीराची महिमा संत आणि ग्रंथांनी गायली आहे. त्याचे तात्पर्य पाच तत्वांनी बनलेल्या शरीराचे नाही. कारण शरीर नाशवंत आहे. परंतु प्राप्त असलेल्या विवेकबुद्धी आणि विचारशक्तीमुळे ते श्रेष्ठ आहे.
विवेक बुद्धीचा सदुपयोग करुन आपण मानव जीवनाचे कल्याण करु शकतो. पण देवदुर्लभ मानवी शरीर प्राप्त होऊनही आम्ही अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आणि सांसारिक लोभातच जीवन व्यर्थ घालवितो. या मायामोहाच्या जंजाळात एवढं गुरफटून गेलो की यातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे.
दु:खाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती! हा मनुष्य जीवनाचा खरा उद्देश असला पाहिजे. त्यासाठी गरज आहे ज्ञानाची. जसे सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो तसेच प्रभुचे ज्ञान झाले की, अज्ञान नाहीसे होते. या प्रभुला पाहिल्यावरच याच्याशी प्रेम करता येईल. म्हणूनच आवश्यकता आहे गुरुची. गुरु म्हणजे मनुष्य नव्हे तर मनुष्य रुपातील सगुण - साकार ईश्वरच होत.
संत तुकाराम महाराज म्हणतात
सद्गुरू वाचोनि सापडेना सोय,
धरावे ते पाय, आधी आधी.
मनुष्य जीवनाला सकारात्मक बदल करण्याचे कार्य सद्गुरू करतात. आणि यासाठीच सदगुरूंनी नितांत आवश्यकता आहे. संत नामदेव बालपणी विठ्ठलाशी बोलायचे-खेळायचे... भरवायचे परंतु त्या भक्तीला पूर्णत्व लाभले नाही. ज्यावेळी संत विसोबा खेचर स्वामींकडून त्यांना ज्ञान प्राप्त झाले, त्याचवेळी खºया देवाची ओळख झाली, मग संत नामदेवांनी ही भागवत पताका पंजाबात नेली.
नामदेव महाराज म्हणतात आधी देवाशी ओळखावे...मग त्याशी अनन्यभावे भजावे....अखंडची ध्यान धरावे, सर्वोत्तमाचे ।
सर्वोत्तम असणारा परमेश्वर याला अगोदर ओळखणे गरजेचे आहे. म्हणून निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज नेहमी म्हणायचे... एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा. विश्वबंधुत्व निर्माण होण्यासाठी एका प्रभू परमात्म्याची ओळख होणे गरजेचे आहे. संत मिराबाई म्हणतात त्याप्रमाणे पायो जी मैने राम रतन धन पायो। अशीच अवस्था होत असते.
संकलन- राजकुमार वाणी, ज्ञानप्रचारक.