धनत्रयोदशीचा साधला मुहूर्त : ३०० चारचाकी, ७०० दुचाकींची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 11:59 AM2019-10-26T11:59:25+5:302019-10-26T11:59:49+5:30
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी
जळगाव : दीपावली पर्वातील खरेदीसाठी अनन्य साधारण महत्त्व असलेल्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शुक्रवारी शहरातील दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दालन ग्राहकांनी गजबजून गेले होते. दीपावलीच्या पहिल्याच खरेदी मुहूर्तावर तब्बल ३०० चारचाकी, ७०० दुचाकींची विक्री होऊन एलईडीसह सर्वच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मोठी मागणी राहिली. सोबतच कपडे व इतर साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होऊन संध्याकाळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वाहन बाजार सुसाट
धनत्रयोदशीला सोन्यात मोठी उलाढाल होण्यासह दुचाकी, चारचाकीचा बाजारदेखील गजबजला होता. यामध्ये एकाच दालनामध्ये ३५० दुचाकींची विक्री झाली. इतर दालने मिळून ७०० दुकानांची विक्री झाली. तसेच ३०० चारचाकींची विक्री झाली. यात एकाच दालनातून १७३ चारचाकी विक्री झाल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे बुकिंग करण्यात आलेल्या चारचाकींची संख्या पाहता चारचाकी कमी पडल्या. दिवाळीपर्वासाठी एकाच दालनात ३५९ चारचाकींचे बुकिंग झालेले आहे. त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
एलईडीला अधिक मागणी
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये एलईडीला मोठी मागणी राहिली. या सोबतच फ्रिज, वाशिंग मशिन यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तसेच मोबाईल खरेदीसाठीदेखील विविध दुकानांवर गर्दी होऊन जवळपास ३०० मोबाईल विक्री झाल्याचे सांगण्यात आले.
कपडे, फटाके खरेदीचीही लगबग
बाजारपेठेत कपडे खरेदीसाठीदेखील ग्राहकांनी गर्दी केली. यामध्ये रेडीमेड कपड्यांना अधिक मागणी राहिली. दिवाळीचा आंनद साजरा करण्यासाठी फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या दुकानांवरही गर्दी असून नवीन विविध प्रकारच्य फटाक्यांना अधिक पसंती दिली जात आहे.
वाहनांच्या रांगा
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरेदीचा खोळंबा होत असल्याने शुक्रवारी पावसाने उसंत दिली व सर्वांना दिलासा मिळाला. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरवासीयांसह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे वाहने लावण्यास जागाही कमी पडत होती. संध्याकाळी तर विविध चौकांमध्ये वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिस्क वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद राहिला. विविध योजनांचाही ग्राहकांकडून फायदा घेतला जात आहे.
- महेंद्र ललवाणी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेते.
चारचाकीच्या खरेदीस मोठा प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी एकाच दिवसात १७३ चारचाकींची विक्री झाली.
- उज्ज्वला खर्चे, व्यवस्थापक.
धन्वंतरीचे पारंपरिक पद्धतीने पूजन
धनत्रयोदशीला धन्वंतरीची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर घरातील धनाची देखील यावेळी पूजा करुन आरोग्यासह सुखसमृद्धी नांदावी. यासाठी प्रार्थना करण्यात आली.