बाहेती शाळेजवळील रस्त्याला सुरक्षा कठडे उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:41 AM2020-12-11T04:41:59+5:302020-12-11T04:41:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील त्र्यंबकनगरातील बाहेती शाळेच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्याला सुरक्षा कठडे नसून खाली जवळपास १५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील त्र्यंबकनगरातील बाहेती शाळेच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्याला सुरक्षा कठडे नसून खाली जवळपास १५ फुटाची दरी आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याबाबत मनपा आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल. सुरक्षा भिंत अथवा कठडे तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी दिल्या.
''उपमहापौर आपल्या दारी'' उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १३ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक जितेंद्र मराठे, ज्योती चव्हाण, सुरेखा तायडे, माजी स्थायी समिती सभापती ॲड.सूचिता हाडा, मीनाक्षी पाटील, चेतन सनकत, मनोज आहुजा, भरत सपकाळे, मनोज काळे, चंदन महाजन, कुंदन काळे, महेश जोशी, राहुल वाघ आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.
मेहरूण तलाव परिसरात गटारींची व्यवस्था करा
मेहरूण तलाव काठ परिसरात अनेक रहिवासी असून, त्याठिकाणी गटारी नाही. तसेच इतर प्रभागातील पाणी त्याठिकाणी जमा होत असल्याने डास, मच्छरांचा त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. उपमहापौर सुनील खडके यांना याबाबत विचारणा केली असता तलाव परिसरात बांधकाम परवानगी देताना त्याठिकाणी नागरिकांनी स्वतः शोषखड्डा तयार करून त्यात सांडपाणी जिरवावे अशी अट घालून देण्यात आलेली असल्याची माहिती दिली. दरम्यान, उपमहापौरांनी तलाव परिसरात भूमिगत गटारी करता येतील का याची माहिती घेऊन नागरिकांची सोय करून द्यावी, असे सांगितले.