लालपरीतील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:45 AM2021-02-20T04:45:48+5:302021-02-20T04:45:48+5:30
जळगाव : प्रवासाची विविध साधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असली, तरी आजही शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे बाहेरगावी जाण्याकरिता लालपरीच्या ...
जळगाव : प्रवासाची विविध साधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असली, तरी आजही शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे बाहेरगावी जाण्याकरिता लालपरीच्या प्रवासालाच प्राधान्य आहे. एकीकडे प्रवाशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र या प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. शुक्रवारी दुपारी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने जळगाव आगारातील काही बसेसची पाहणी केली असता, एकही बसमध्ये अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार पेट्या दिसल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव आगारात पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची वर्दळ असते. दिवसभरात साधारणत: २० ते २५ हजार प्रवासी लालपरीने प्रवास करतात. दरम्यान, महामंडळातर्फे एकीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखकर प्रवासासाठी सदैव कटिबद्ध असल्याची घोषणा करण्यात येत असताना दुसरीकडे मात्र महामंडळाची ही घोषणा फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने बाहेरगावी जाण्यासाठी जळगाव आगारात लागलेल्या बसेसची पाहणी केली असता, या बसमध्ये कुठेही अग्निशमन यंत्रणा दिसली नाही तसेच प्रवासात कुठे दुर्घटना घडल्यास प्रथमोपचार पेटीही या गाड्यांमध्ये नव्हती. तसेच स्थानकात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिला प्रवाशीही सुरक्षित नसल्याचे पाहायला मिळत आहे.
इन्फो :
या बसमध्ये अग्निशमन यंत्रणाच नाही
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत जळगाव आगारातून बाहेरगावी जाणाऱ्या (एमएच २० बीएल ३००६) व (एमएच २० बीएल ०७६१) या बसमध्ये कुठलेही अग्निशमन यंत्रणेचे साहित्य दिसून आले नाही. याबाबत काही बसेसमधील चालकांना विचारले असता, त्यांनी पूर्वी बसमध्ये अग्निशमन यंत्रणा असायची. मात्र, आता बसमध्ये कुठलीही तशी यंत्रणा नसल्याचे उत्तर दिले.
इन्फो :
प्रथमोपचार पेट्याही गायब
बसमध्ये अग्निशमन यंत्रणेसह प्रथमोपचार पेट्याही नसल्याचे दिसून आले. बसमध्ये एखाद्या प्रवाशाला किरकोळ दुखापत झाल्यास, या प्रथमोपचार पेटीद्वारे प्रवाशावर तत्काळ प्राथमिक उपचार केले जातात. मात्र, बहुतांश बसमध्ये प्रथमोपचार पेट्या नव्हत्या तर एका बसमध्ये पेटी होती मात्र त्यात प्रथमोपचाराचे साहित्य नव्हे तर बसच्या काचा पुसण्याचे फडके होते.
इन्फो :
आगारात आओ जाओ घर तुम्हारा...
बसस्थानकात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर महिलांच्या सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानकात प्रवाशांव्यक्तिरिक्त बाहेरील कुणीही नागरिक येऊन इकडे-तिकडे फिरत असतात. विशेष म्हणजे शहरातील काही टवाळखोर मुले स्थानकातच बेशिस्तपणे गाड्या उभ्या करुन गप्पा मारताना दिसून आली. यावेळी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असलेले आगारातील सुरक्षारक्षक कुणाचीही चौकशी न करता, स्थानकातच गप्पा मारताना दिसून आले.
इन्फो :
वायफाय सुविधा नावालाच
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी बसमध्ये एका खासगी कंपनीच्या माध्यमातून जळगावसह राज्यभरात वायफाय बॉक्स बसवले होते. मात्र, या वायफाय बॉक्सचा उपयोग कसा करावा, याबाबत वाहकानांच माहिती नसल्यामुळे काही महिन्यातच या सेवेचा बोजवारा उडाला. विशेष म्हणजे काही प्रवाशांनी हे वायफाय बॉक्सच चोरून नेले असल्याचे काही चालकांनी सांगितले. दरम्यान, गेल्यावर्षापासून महामंडळ प्रशासनानेच ही सेवा बंद केली असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
शेवटचे बाक ‘स्मोकिंग झोन’
रेल्वेप्रमाणे बसमध्ये धूम्रपान करण्याला बंदी आहे. मात्र, असे असताना काही धूम्रपान करणारे प्रवासी बसमधील शेवटच्या बाकावर बसून ‘स्मोकिंग’ करत आहेत. या बाकांच्या खाली अनेक ठिकाणी सिगारेट व गुटख्याच्या पुड्या पडलेल्या पाहायला मिळाल्या. तसेच धूम्रपानामुळे काही बसेसमधील खिडक्याही रंगलेल्या दिसून आल्या.