हरताळे तलावातील साई मंदिराची भाविकांवर भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 04:58 PM2020-11-11T16:58:31+5:302020-11-11T16:59:19+5:30
निसर्गाच्या किमयेने हरताळे येथील साई मंदिराचा परिसर तलावामुळे अधिकच नयनरम्य दिसत आहे.
चंद्रमणी इंगळे
हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदा निसर्गाच्या कृपेमुळे येथील पर्यटन स्थळ असलेला तलाव व त्या तलावात उभारण्यात आलेले साईमंदिर हे अगदी एका बेटावरील नयनरम्य विहंगम दृष्य जणूकाही पर्यटक व भाविकांच्या डोळ्यांना मोहित करीत आहे.
यंदा तलावाचा व तलावा किनारी असलेल्या मंदिराचा देखावा सगळीकडे हिरवळ दाटलेली असूनल आनंदी आनंद सगळीकडे दिसत आहे.
येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर, पुरातन शिवशक्ती मंदिर व त्याच जोडीला असलेले मातृ-पितृ भक्त शिरोमणी श्रावण बाळाची मंदिर आदींच्या पावन स्मृतीमुळे गावचा देखावा सर्वांनाच डोळ्यात भुरळ पाडत आहे. तसेच यापैकी चहूबाजूने पाणी असलेले साईमंदिर पर्यटकांना खुणावत आहे. असे असले तरी कोरोनामुळे भाविकांसह पर्यटक दुर्मिळ झाले आहे.
प्रती शिर्डी साई मंदिर स्वप्नपूर्ती
गावातील भाविक भक्त आणि तरुणांच्या पुढाकाराने व पंचक्रोशीतील भाविकांनी साथ देत गेल्या १२ वर्षापूर्वीपासून मंदिर यही बनायेंगेच्या कयास धरत दरवर्षी मनोकामना पूर्ण करण्यासाठी मातृपितृ भक्त श्रावण बाळ समाधी मंदिर हरताळा ते ओम साई मंदिर शिर्डी येथे पायी पालखी घेऊन जात. प्रती शिर्डी मंदिर यही बनायेंगे" अशा उक्तीने मनोकामना पूर्ण करीत येथील भक्तांनी नयनरम्य असलेल्या तलावाच्या बेटावर मंदिराची पायाभरणी केली आणि दरवर्षी पायी जात बांधण्यासाठी वर्गणी गोळा करत साई मंदिर उभारले आहे. भाविकांना शिर्डीला दर्शनासाठी जावे लागत असताना काहींच्या अडचणी असत. त्यामुळे पंचक्रोशीतील भाविकांना गावातच शिर्डीच्या साईचे प्रति शिर्डी म्हणून दर्शनाचा लाभ येथेच मिळत असल्याने मनःशांती लाभत आहे. मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर येथे दर गुरुवारी प्रसाद म्हणून खिचडी घेण्यासाठी भाविक येतात . दाते प्रसाद दान करतात. यातूनच आता साई प्रतिष्ठान हरताळे म्हणून नावारूपाला येत आहे.
गावातील डॉ.पंकज चौरे, सरपंच जयेश कार्ले, भागवत धबाडे, मधुकर भगत, ऋषिकेश जोशी, आदेश कार्ले, अविनाश लोखंडे, गजानन ठाकूर, रवी महाजन, रमेश कुंभार, रवींद्र चौधरी, जितेंद्र वाघ, वडस्कर आदींसह गावातील तरुण स्वयंस्फूर्तीने सेवा देतात.