साईडपटय़ांची दुरुस्ती ‘बोलाचा भात अन् बोलाची कढी’
By admin | Published: February 14, 2017 11:52 PM2017-02-14T23:52:24+5:302017-02-14T23:52:24+5:30
अनास्था : आठवडा उलटूनही आश्वासनाची पूर्तता नाही; दुरुस्तीला प्रारंभ कधी होणार?
जळगाव : सर्वसामान्य नागरिकांसाठी जिवघेणा ठरत असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या साईडपट्टी दुरुस्तीचे काम आठवडाभरात सुरु करण्याचे आश्वासन ‘बोलाचा भात अन् बोलाची कढी’ ठरली आहे. आठवडा उलटूनही कामाला सुरुवात न झाल्याने केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांनी केराची टोपली दाखविली असल्याचा सुर शहरात उमटत आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नांसंदर्भात रविवार 5 फेब्रुवारी रोजी जळगावचे आमदार सुरेश भोळे व आमदार चंदूभाई पटेल यांनी नागपूर येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. महामार्गाच्या साईड पट्टयांची मोठी दुरवस्था झाली असून महामार्गावर गेल्या 45 दिवसात 11 जणांना प्राण गमवावे लागल्याची माहिती आमदार भोळे यांनी गडकरी यांना दिली. नितीन गडकरी यांनी दोन्ही आमदारांची भावना समजून घेत आठवडाभरात महामार्गाच्या साईडपट्टीचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यांच्या भेटीला 9 दिवसांचा कालावधी उलटला तरी साईडपट्टी दुरुस्तीच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांकडून सुरुवात करण्यात आलेली नाही. साईडपट्टी दुरुस्तीसाठी महामार्ग विभागाचे अधिकारी आणखी बळी जाण्याची वाट पाहत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.