संत आप्पा महाराज ते हभप मंगेश महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:04 PM2018-12-16T12:04:04+5:302018-12-16T12:04:41+5:30
श्रीराम मंदिर संस्थान हे खान्देशातील रामभक्तांचे श्रद्धास्थान
चंद्रशेखर जोशी
जळगाव : श्रीराम मंदिर संस्थान हे खान्देशातील रामभक्तांचे श्रद्धास्थान म्हणून परिचित आहे. ग्राम दैवत श्रीराम मंदिर संस्थान या नावाने या संस्थानची ओळख. संत अप्पा महाराज यांनी पंढरपूरवारीला सुरूवात केली. १८७२ ते१९१० असा संत अप्पा महाराजांचा कार्यकाळ. त्यांच्या काळात मंदिरात विविध परंपरांना सुरूवात झाली. मानाची संत मुक्ताईची पालखी याच संस्थानाने अप्पा महाराजांच्या पुढाकारातून सुरू केली. पंढरपूरातील एका मानाची पालखी म्हणून जळगावच्या या पालखीचा गौरव होत असतो. अप्पा महाराजांची परंपरा दुसरे गादीपती वै. ह.भ.प. सद्गुरू वासुदेव महाराज १९१० ते १९३७ असा त्यांचा कार्यकाळ. त्यांनीही आप्पा महाराजांच्या परंपरा सुरू ठेवल्या. त्याच्या काळात संस्थानच्या लौकीकात भरच पडली. यानंतर तिसरे गादीपती वै. ह.भ.प. सद्गुरू केशव महाराज यांचा कार्यकाळ १९३७ ते १९७५, चौथे गादीपती वै.ह.भ.प. सद्गुरू बाळकृष्ण महाराज यांचा कार्यकाळ १९७५ ते २००२ असा होता तर पाचवे विद्यमान गादीपती म्हणून ह.भ.प.मंगेश महाराज हे २००२ पासून गादीपतीची परंपरा सांभाळून आहेत.
अखंड परंपरेची ज्योत
ह.भ.प. मंगेश महाराज हे देश, देव आाणि धर्मापती लहानपणापासून आवड असलेले व्यक्तीमत्व. धार्मिकतेचा, संतपरंपरेचा पिढीजात वारसा, बालपणापासून रा. स्व. संघाच्या माध्यमातून राष्टÑीयत्वाची संस्कार, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धार्मिक कार्याची निर्माण झालेली आवड व अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काश्मिरातील सत्याग्रहात प्रत्यक्ष
सहभाग असे त्यांचे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. ६ डिसेंबर १९९२ च्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनातही मंगेश महाराज हे आपल्या मित्रमंडळींसह सहभागी झाले होते.
विविध उत्सवांची परंपरा
श्रीराम मंदिर संस्थानच्या माध्यमातून रथोत्सवासह विविध प्रकारचे १२ उत्सव साजरे होत असतात. आषाढी एकादशीला पंढरपूरची पायी वारी, श्रीराम रथोत्सव यासह भजन, कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती, ज्ञानदानाचे कार्य मंगेश महाराजांनी अखंडपणे सुरू ठेवले आहे. संस्थानच्या माध्यमातून हिंदू नववर्ष स्वागत सोहळा व त्यानिमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी निघणारी भव्य शोभायात्रा शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेते.
वारीचा अनुभव
ह.भ.प. मंगेश महाराज सांगतात पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी वारीत पायी जाण्याचा आनंद काही औरच आहे. संत अप्पा महाराजांच्या परंपरेचा वसा आणि वारसा आजही त्याच भक्तीभावाने आम्ही चालवत असल्याचे ते सांगतात.