`शिवशाही`मधून पहाटे पाच वाजता संत मुक्ताई पालखी पंढरपूरला रवाना होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:53+5:302021-07-19T04:12:53+5:30
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत यंदा पंढरपुरातील आषाढी एकादशी सोहळा होणार असून, राज्यातील मानाच्या दहा पालख्यानांच पंढरपुरात ...
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत यंदा पंढरपुरातील आषाढी एकादशी सोहळा होणार असून, राज्यातील मानाच्या दहा पालख्यानांच पंढरपुरात महामंडळाच्या बसने आणण्याची राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार या दहा पालख्यांमध्ये मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचा समावेश आहे. ही पालखी १९ जुलै रोजी पहाटे पाच वाजता मुक्ताईनगर येथून शिवशाही बसमधून पंढरपूरला रवाना होणार आहे. पालखी घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसला महामंडळाच्या कर्मचाऱ्यांतर्फे रात्री उशिरापर्यंत विविध रंगबेरंगी आकर्षक फुलांनी सजविण्याचे काम सुरू होते.
जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पालखी सोहळ्यासाठी जळगाव आगारातून दोन शिवशाही बसेस या, मुक्ताईनगर आगाराला देण्यात आल्या आहेत. मुक्ताईनगर आगारात या बसेस स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्यात आल्या. त्यानंतर या बसेस आकर्षक फुलांनी सजविण्यासाठी संत मुक्ताई संस्थांनतर्फे रविवारी दुपारी सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर बसवर नियुक्त केेलेल्या चालक-वाहकांकडून पालखी घेऊन जाणाऱ्या बसेस रात्री उशिरापर्यंत विविध प्रकारच्या फुलांच्या माळांनी सजविण्याचे काम सुरू असल्याचे मुक्ताईनगर येथील सहायक वाहतूक अधीक्षक अमोल बावस्कर यांनी सांगितले.
इन्फो :
आषाढी वारीसाठी यंदा प्रथमच मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखी शिवशाही बसमधून पंढरपूरला रवाना होणार आहे. महामंडळातर्फे या पालखी सोहळ्यासाठी दोन शिवशाही बसेस उपलब्ध करून दिल्या असून, यावर चालक म्हणून एस. आर. नागरूण व डी. एस. पालवे यांचा समावेश आहे. तर वाहक म्हणून कैलास वंजारी व आर. एम. ठाकूर यांचा समावेश आहे. संत मुक्ताई मंदिर प्रशासनातर्फे पहाटे पाच वाजता मुक्ताईनगर येथून बसेस काढण्याचे नियोजन आहे. त्यानुसार या बसेस पंढरपूरच्या दिशेने निघणार असल्याचे अमोल बावस्कर यांनी सांगितले. तर आषाढी एकादशीनंतर चार दिवसांनी या बसेस संत मुक्ताई पालखी घेऊन, पंढरपूरहून परतणार आहे.