संत मुक्ताबाई -राम पालखीचे विठ्ठल नामाच्या गजरात प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:22 PM2019-06-17T13:22:23+5:302019-06-17T13:23:55+5:30
आषाढी एकादशी : दर्शनासाठी जळगावकरांची अलोट गर्दी
जळगाव : विठ्ठल नामाचा जयजयकार करीत ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानाच्या संत मुक्ताईबाई - राम पालखीने रविवारी सकाळी साडे आठ वाजता पंढपूरच्या दिशेने प्रस्थान केले. पालखीचे दर्शंन घेण्यासाठी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत एकच गर्दी केली होती. या पालखीचे हे १४७ वे वर्ष आहे.
रविवारी सकाळी साडेसात वाजता मंगेश महाराज जोशी यांचे भजन झाले. यानंतर महापौर सीमा भोळे व आमदार सुरेश भोळे यांच्याहस्ते श्रीरामाची सगुण मूर्ती व संत मुक्ताबाईच्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला.
त्यानंतर महाआरती होऊन भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी नारायण महाराज गोसावी सारवडकर, श्रीराम महाराज जोशी, नंदू शुक्ल , मुकूंद धर्माधिकारी, अरुण धर्माधिकारी, श्रीधर जोशी, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सुनील भंगाळे आदी उपस्थित होते.
अन् विठू माऊलीच्या जयघोषात पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
ज्ञानोबा-तुकाराम..श्रीराम जयराम जयजय राम..माऊली-माऊली विठू माऊली अशा प्रकारे पंढरीच्या पाडुरंगाच्या व श्रीरामाच्या जयघोषात रविवारी सकाळी ठीक साडे आठ वाजता संत मुक्ताबाई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखीच्या पुढे श्रीराम महाराज जोशी व इतर वारकऱ्यांनी एका तालात व सुरात टाळ नाद करुन विठू-नामाचा जयघोष केला. यावेळी वारीत डोक्यावर तुळशी अन् मुखी हरीनाम म्हणाºया महिला वारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान, दिलीप सोनवणे, जितेंद्र वाळके, मारोती अटरे, सुपडू पोतदार, पोपट वस्ताद, निंबा घुसर्डीकर यांनी पालखीसाठी मदत केली.
दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी
श्रीराम मंदिरातून मार्गस्थ झालेल्या संत मुक्ताबाई राम पालखीचा शनिवारी रात्री अप्पा महाराज समाधी मंदिरात मुक्काम होता. रविवारी सकाळी पालखीचे पंढरपुरच्या दिशेने पालखीचे प्रस्थान होणार असल्याने भाविकांची दर्शनासाठी सकाळी सहापासूनच गर्दी केली होती. दर्शनासाठी येणारे नागरिक एका तालात अन् सुरात विठू-नामाचा जयघोष करित असल्याने, भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. पालखी अप्पा महाराज समाधी मंदिरातून निघाल्यानंतर दर्शन घेण्यासाठी लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. या वारीत जळगावसह वावडदा,शिरसोली, म्हसावद, असोदा,चिंचोली या भागातील महिला व पुरुष सहभागी दिसून आले. रविवारी रात्री या पालखीचा वावडदा येथे मुक्काम होता.