कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साकारला अनोखा देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:18 AM2021-09-11T04:18:10+5:302021-09-11T04:18:10+5:30
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव जळगाव: विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने यंदा पर्यावरणपूरक आणि ...
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव
जळगाव: विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने यंदा पर्यावरणपूरक आणि अनोखा गणेशोत्सव साजरा होत आहे. कोरोनाकाळात समाजावर झालेला प्रभाव आणि त्यातून सकारात्मकतेने ही परिस्थिती कशा पद्धतीने हाताळली गेली, याची बोलकी कलाकृती साकारण्यात आली आहे.
प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनात, कलाशिक्षक दत्तात्रय गंधे, नितीन सोनवणे, राजेश्वरी सोनवणे यांच्यासह दीपाली बडगुजर, जयश्री पाटील, लीना जोशी या शिक्षकांनी टाकाऊ वस्तूंमधून कोरोना काळामध्ये कोरोना वॉरियर्सने केलेली महत्त्वपूर्ण भूमिका त्याचबरोबर प्रत्येक गावात, शहरात प्रशासनाची सुसज्ज यंत्रणा, विद्यार्थ्यांची ऑनलाइन शाळा यापासून तर सामान्य जनजीवनाचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला आहे. कोरोना वॉरियर्सप्रमाणे शिक्षकांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण ठरली. त्यांनी ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याची अखंड उभारणी केली, त्याचे देखील चित्रण याठिकाणी पाहायला मिळते. या परिस्थितीची स्वाती बेंद्रे यांनी सुरेख ध्वनिफीत करून वास्तव वर्णन केले.
कलाशिक्षक दत्तात्रय गंधे यांनी वीणावादन करणारा गणपतीबाप्पा शाडू मातीतून साकारला. गणेश स्थापनेच्या वेळी ढोल-ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं आगमन झालं. प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील आणि नूतन ज्ञानेश्वर पाटील यांनी गणेश स्थापना पूजा केली. यावेळी तीनही विभागांचे समन्वयक आणि सेमी विभागाचे मुख्याध्यापक हेमराज पाटील, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख संतोष चौधरी आणि अनुराधा धायबर यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.