रोहित्र जळाल्याने साकेगावकरांची दिवाळी अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 05:23 PM2020-11-11T17:23:43+5:302020-11-11T17:24:48+5:30
साकेगाव येथे रोहित्र जळाल्याने गेल्या आठ दिवसांपासून साकेगावकर अंधारात आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावात अंधार असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
भुसावळ : उत्साह, आनंद आणि चैतन्याचा उत्सव असलेला दिवाळी अर्थात प्रकाशपर्वाचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र साकेगाव येथे रोहित्र जळाल्याने गेल्या आठ दिवसांपासून साकेगावकर अंधारात आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावात अंधार असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
काळा हनुमान मंदिर परिसराजवळ असलेले रोहित्र गेल्या आठ दिवसांपूर्वी जळाले होते. या ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात आले. मात्र तीन-चार तास विद्युत पुरवठा केल्यानंतर पुन्हा नवीन रोहित्रही जळाले. त्या दिवसापासून गावातील धनगरवाडा, गांधी चौक परिसराचा काही भाग, वाल्मीक मंदिर परिसर हा भाग पूर्णत: अंधारात आहे. प्रकाशपर्व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी आकाशकंदील, पणत्या लावून रोषणाई होत असताना मात्र वीजपुरवठा नसल्याने घरात अंधार निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वीज चोरी मुळे रोहित्र जळाले
या परिसरात विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करण्यात येते, असे वीज कंपनीचे म्हणणे आहे. परिणामी वारंवार रोहित्र जळण्यासारखे प्रकार होत आहे. असे असले तरी वीज चोरी करणाऱ्यांमुळे नियमित वीज बिल भरणा करणाऱ्यांना शिक्षा का, असा मोठा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.
वीजचोरांवर कारवाई करा
काही लोक जर विजेची चोरी करत असतील तर त्याचा भुर्दंड इतर वीजधारकांनी का करावा, विशेष पथक बोलून वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करा, मात्र जे नियमित वीजबिल बिल भरतात, त्यांचा वीजपुरवठा नियमित व सुरळीत करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा संतापजनक इशारा ग्रामस्थांकडून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रकाश पर्वात वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या परिसरात शेगडी, हिटरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. मध्यंतरी अशांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कालांतराने पुन्हा शेगडी, हिटरचा वापर सुरू झाला. अशांवर पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल. ज्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होणे अपेक्षित आहे.
-दिलीप कोल्हे, सहाय्यक अभियंता, वीज उपकेंद्र, साकेगाव, ता.भुसावळ