कोरोनाच्या संकट काळात सालदारकीला मिळणार चांगला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:16 AM2021-05-13T04:16:11+5:302021-05-13T04:16:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दरवर्षी आखाजीच्या दिवशी ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडे वर्षभरासाठी सालदार नेमण्यात येत असतो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दरवर्षी आखाजीच्या दिवशी ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडे वर्षभरासाठी सालदार नेमण्यात येत असतो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी सालदारकीला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. सालदारांना ही परवडणार व शेतकऱ्यांनाही परवडणार असा भाव यंदा लागण्याची शक्यता आहे. दरवर्षीच हे भाव ७२ हजार ते ८० हजारांच्या दरम्यान असतात. त्यामुळे यंदा किती भाव मिळतो, याबाबत उत्सुकता आहे.
खरीप हंगामापासून शेतीचे नवीन वर्ष सुरू होत असते. वर्षभर आपल्याकडे काम करण्यासाठी सालदाराची निवड शेतकरी करत असतात. आखाजीच्या दिवशी हा भाव फुटत असतो. दरम्यान, आधुनिक शेतीच्या काळात सालदार प्रथादेखील आता कमी होत जात असून, चोपडा, रावेर, यावल या ठराविक तालुक्यांमध्ये आखाजीच्या दिवशी सालदाराचा भाव फुटत असतो. तसेच अनेक गावांमध्ये मोठे व सधन शेतकरीदेखील आता कमी होऊ लागले आहेत. सालदार ठेवण्यापेक्षा रोजंदारीवर मजूर ठेवण्याची पद्धत आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. तसेच सातपुडा परिसरातून पावरा समाजाचे मजूरदेखील आता गावोगावी उपलब्ध होऊ लागले आहेत.