घटस्थापनेच्या मुहूर्तावर जळगावात 500 दुचाकी, 200 चारचाकींची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:59 PM2017-09-21T23:59:39+5:302017-09-22T00:04:39+5:30
घटस्थापनेपासूनच बाजारपेठेत उत्साहाची स्थापना : मोबाईल, वाशिंग मशिनचा बाजारात धमाका
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 21 - नवरात्रोत्सवामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून बाजारात वाहन खरेदी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीचीही मोठी लगबग दिसून येत आहे. घटस्थापनेचा मुहूर्तावर 500 दुचाकी तर 200 चारचाकींची खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स बाजारात या वेळी वाशिंग मशिन व मोबाईलला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले.
साडेतीन मुहूर्तांसह अनेकजण घटस्थापनेलाही विविध वस्तू खरेदी करतात. त्यानुसार अनेकांनी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक्स् वस्तूंचे बुकिंग केलेले होते. घटस्थापनेच्या दिवशी सकाळपासूनच दुकानांमध्ये सुरू झालेली गर्दी रात्रीर्पयत कायम होती. मनाजोगे वाहन व वस्तू मिळाव्या म्हणून मोठय़ा प्रमाणात बुकिंग केलेले होते. त्यामुळे गुरुवारी घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली.
सण-उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर सध्या विविध कंपन्यांकडून वेगवेगळ्य़ा योजना राबविल्या जात आहे. अर्थसाहाय्य तसेच भेटवस्तू देण्यासह एक्सचेंज ऑफरही असल्याने याचाही ग्राहक मोठय़ा प्रमाणात फायदा घेत आहेत. यामध्ये जुन्या वाशिंग मशिनला 10 हजार रुपयांचा मोबदला दिला जात असल्याने वाशिंग मशिनला सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
चारचाकींचे द्विशतक
चारचाकींच्या बाजारात मोठी धूम दिसून येत असून गुरुवारी किमान 200 चारचाकी रस्त्यावर आल्या. शहरातील नामांकित एकाच शोरुमध्ये संध्याकाळर्पयत तब्बल 100 चारचाकींची विक्री झाली. इतर शोरुमचे मिळून एकूण 200 चारचाकींची विक्री झाली. यामध्ये दसरा, दिवाळीसाठी 400 चारचाकींचे बुकिंग झालेले असल्याचीही माहिती देण्यात आली.
500 दुचाकींची विक्री
शहरातील दुचाकीच्या एकाच शोरुमध्ये 175 दुचाकींची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. इतर सर्व शोरुमचे मिळून किमान 500 दुचाकींची खरेदी झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये मोपेड गाडय़ांना अधिक पसंती असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. रात्री आठ वाजेर्पयत दुचाकींच्या दालनात खरेदी सुरू होती.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठीही बाजार गजबजला आहे. वॉशिंग मशिनला अधिक पसंती दिसून येत आहे. त्या खालोखाल फ्रिज, एलईडीला मागणी आहे. या वस्तूंचेच मोठय़ा प्रमाणात बुकिंग झालेले होते.
मोबाईल बाजारातही मोठी धूम असून विविध सुविधायुक्त नवनवीन मोबाईल बाजारात येत असल्याने अनेकजण त्यांना पसंती देत आहेत. त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी एकाच दिवसात तब्बल 200 मोबाईल विक्री झाले.
सुवर्ण खरेदीला झळाळी
पितृपक्ष पक्ष संपताच सुवर्ण खरेदीला झळाळी आली असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आली. नोटाबंदी, जीएसटीत अडकलेल्या सुवर्ण बाजारात पितृपक्षामुळेही खरेदीला पाहिजे तसा प्रतिसाद नव्हता. मात्र पितृपक्ष संपून आज घटस्थापनेला सुवर्णबाजारात गर्दी झाली होती. यामध्ये लहान आकाराच्या दागिन्यांना मोठी मागणी होती.
पितृपक्षापेक्षा आता सुवर्ण खरेदीसाठी चांगला उत्साह दिसून येत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर चांगला प्रतिसाद राहिला.
- पप्पू बाफना, सुवर्ण व्यावसायिक.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज 100 चारचाकींची विक्री झाली. खरेदीसाठी चांगला प्रतिसाद असून ग्राहकांचा उत्साह दिसून येत आहे. दसरा-दिवाळीसाठी 400 चारचाकींचे बुकिंग झालेले आहे.
- उज्जवला खर्चे, व्यवस्थापक.
दुचाकी खरेदीसाठी मोठा उत्साह असून आमच्याकडे रात्रीर्पयत खरेदीसाठी गर्दी होती. आमच्या दालनात आज एकाच दिवसात 175 दुचाकींची विक्री झाली.
- अमित तिवारी, महाव्यवस्थापक.
इलेक्ट्रॉनिक्स् वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी असून वाशिंग मशिन, मोबाईला जास्त मागणी आहे.
- दिनेश पाटील, विक्रेते.