भरुडखेड्यात अवैध दारुची विक्री सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 06:34 PM2019-07-16T18:34:12+5:302019-07-16T18:34:59+5:30
कारवाईनंतर भाव झाले दुप्पट : पोलिसांच्या वॉश आऊट मोहिमेचा उडाला फज्जा
मनोज जोशी ।
पहूर, ता.जामनेर : भारूडखेडा, ता. जामनेर येथे अवैध दारु विक्रीच्या सुळसुळाटाविरुद्ध महिलांच्या तक्रारी नंतर पालकमंत्र्यानी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी हतभट्टयांवर धाडी टाकून दारुचे रसायन जप्त केले. मात्र यानंतरही येथे दारुची विक्री होत असून आता कारवाईमुळे भाव दुप्पट झाले आहे. यामुळे डिवायएसपींच्या गेल्या दोन दिवसांमधील कारवाईचा याठिकाणी फज्जा उडल्याचे स्पष्ट होत आहे.
‘लोकमत’ प्रतिनिधीने मंगळवारी गावात भेट दिली असता चोरून लपून गावठी दारूची दुप्पट भावाने दारू विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील भारूडखेडा हे हजार ते अकराशे लोकसंख्येचे गाव असून वाकोद -तोंडापूर रस्त्यावर आहे.
गावठाण परिसरात
अनेक हातभट्टया
भारूडखेडा गावाच्या बाजुलाच वाडीचा गावठाण परीसर आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावठी दारूच्या हातभट्टया असल्याने येथे दारूची प्रचंड विक्री होते. तर बाहेरूनही काही लोक यागावात दारु पिण्यासाठी गर्दी करतात. विशेष म्हणजे सात ते आठ या कोवळ्या वयाची मुलेही शिक्षणात रमण्याहेवजी दारूच्या नशेत रमल्याची धक्कादायक माहितीही या गावातून मिळाली.
लहान मुलेही व्यसनाधीन झाल्याची पालकमंत्र्यांकडे तक्रार
भारुडखेडा येथून मंत्री महाजन आपल्या वाहनाने जात असताना येथील काही महिलांनी महाजन यांच्या समोर दारूबंदीविषयी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. लहान- लहान मुले व्यसनाधीन होऊन संसार उघड्यावर येत असल्याबाबत आपबीती मांडल्याने महाजन यांनी पोलिस विभागाला खडेबोल सूनावून कारवाईचे आदेश दिले.
दोन ड्रम दररोज गावठीची विक्री
भारूडखेडा हे जामनेर तालुक्यातील गावठी दारूचे मुख्य केंद्र असून याबरोबरच ताडीची विक्री केली जाते. तर सट्टा व पत्ता असे अवैध धंदे चालत असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका ग्रामस्थाने लोकमतला सांगितले आहे.याठिकाणी आठ ते दहा हातभट्टयांवर दारु पाडून दररोज दोन ड्रम दारूची विक्री होत आहे. दोन दिवसात झालेल्या पोलीस कारवाई मुळे मंगळवारी चोरून लपून दारूची विक्री होत असल्याचे पाठविलेल्या डमी ग्राहकाकडून समोर आले आहे. बंदी असल्याने दहा रुपयांचा ग्लास वीस रुपात दिला जात आहे.
भारुडखेडा भागात पोलीसांनी सकाळी कारवाई केली तर दुपारी लगेच हातभट्टया सुरू होतात. कित्येक वर्षांपासून गावठीचा महापूर येथे वाहत असल्याचे सांगण्यात आले आहे. येथील या हातभट्टया कायम बंद पाडणे,हे पोलिसांसमोर आव्हानच असल्याचे बोलले जात आहे.
पुन्हा पालकमंत्र्यांच्या आदेशाची गरज पडेल का ?डिवायएसपी ईश्वर कातकडे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट यांनी सोमवारी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यावाल्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून आले. यामुळे धंदे बंद पडले नाही, फरक इतकाच झाला की, राजरोसपणे चालणारे धंदे चोरून लपून चालविले जात आहे. कारवाई वरिष्ठांना दाखविण्यासाठी तर झाली नाही ना? हा प्रश्न भारुडखेड्यातील सुज्ञ नागरीक उपस्थित करीत आहे. कारवाई नियमित होण्यासाठी पुन्हा पालकमंत्र्यांच्या आदेशाची गरज पडेल काय ? असा प्रश्नही उपस्थित होत असून दारुबंदीची मागणी येथील महिलांनी केली आहे.
पोलिसांना परीसरातून सव्वा लाखाचा हप्ता !
परिसरातील अवैध धंद्यांबाबत गावातून पहूर पोलिस स्टेशनला वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र कारवाई एका दिवसापुरती होते. हे धंदे चालविण्यासाठी एका गावातून सुरवातीला एक हजाराचा हप्ता होता आता त्यात वाढ होऊन सतराशे झाला असून यापरीसरातून संबंधित बीट हवलदाराकडे एक ते सव्वा लाखांचा हप्ता पोहचत असल्याचे बोलले जात असून यामुळेच अवैध धंद्यावाल्यांना पोलिसांची भीती वाटत नाही.
हातभट्टीवर काम करणाऱ्या तरुणाच्या आत्महत्येचे गुढ कायम
भारूडखेडा येथील वाडीपरिरातील राजेश उर्फ खंडू सुरभ गोसावी (२५) हा विवाहित तरुण हातभट्टी वर कामाला होता. आधी तो दुसरीकडे काम करायचा मात्र गेल्या १५ दिवसांपाूसन ते हातभट्टीवर कामाला लागला होता. त्याने चार दिवसांपूर्वी स्वत: ला जाळून आत्महत्या केल्याची दुदैर्वी घटना घडली आहे. घटना घडण्याच्या दोन दिवसांपूर्वी राजेश वेड्यासारखा करीत होता.आत्महत्या कशामुळे केली आहे, याचे कारण अस्पष्ट असल्याचे नातेवाईकांनी सांगितले असून आत्महत्याचे गुढ कायम आहे.
पालमंत्र्याकडून मदतीचे आश्वासन
या कुटूंबाचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गोसावी कुटूंबाची शनिवारी भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.