जप्त मालमत्तेची विक्री; कर्जदारासह सहदुय्यम निबंधक, तलाठी मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
By विजय.सैतवाल | Published: February 24, 2024 11:49 PM2024-02-24T23:49:22+5:302024-02-24T23:50:37+5:30
हस्तांतरण, बोझा लावण्यास मनाईचे न्यायालयाचे आदेश असतानाही केले व्यवहार
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : कर्जापोटी जप्ती करण्यात आलेल्या मालमत्तेचे हस्तांतरण, बोझा लावण्यास मनाई असल्याचे न्यायालयाचे आदेश असतानादेखील खोटे घोषणापत्र व शपथपत्र सादर करुन कर्जदाराने मालमत्तेची विक्री केली. यातून मध्यप्रदेशातील पाच कंपन्यांची आठ कोटी १६ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये कर्जदारासह त्याच्याशी संगनमत केल्याप्रकरणी सह दुय्यम निबंधक, तलाठी, मंडळ अधिकारी असे एकूण १२ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील इंदूर येथील पाच वित्त पुरवठा कंपन्यांकडून काझी सैय्यद अहमदअली व अमतुल लतीफ काझी (दोघे रा. काझीवाडा, नशिराबाद, ता. जळगाव) यांनी त्यांच्या पेट्रोलपंपासाठी वेगवेगळे १९ प्रकारचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे इंदूर न्यायालयात कंपन्यांकडून दिवाणी दावे दाखल करण्यात आले होते. कर्जदारांनी तडतोडीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने लोकअदालतमध्ये आदेश देऊन कर्जदारांना ३१ डिसेंबर २०१२ पर्यंत परतफेड करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यांनी परतफेड न केल्यामुळे इंदूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. कर्जदार हे नशिराबाद येथील असल्याने ही याचिका जळगाव न्यायालयात वर्ग झाली होती. कर्जाची मूळ रक्कम ही दोन कोटी दहा लाख होती. मात्र त्यावर आतापर्यंत व्याज व इतर शुल्क मिळून ही रक्कम आठ कोटी १६ लाख ३० हजार ३५६ एवढी वसूल करायची आहे. त्यामुळे कर्जदारांच्या स्थावर मिळकती, बँक खाती व जंगम मालमत्तेची प्रतिबंधात्मक जप्ती आदेश न्यायालयाने दिले. त्यात कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत अथवा बोझा लावण्यास मनाईदेखील करण्यात आली. त्याची प्रत महसूल विभागालादेखील पाठवण्यात आली होती.
असे असतानादेखील कर्जदारांनी सह दुय्यम निबंधक, तलाठी, मंडळ अधिकारी यांना हाताशी धरुन संगनमताने जप्त मालमत्तेचे वेगवेगळे हिस्से करत खोटे घोषणापत्र व शपथपत्राच्या फेरफार नोंदी करत त्यांची विक्री केली. त्याचप्रमाणे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क वाचविण्यासाठी व्यवहाराचे मूल्य कमी दाखवण्यात आले. या मिळकती अब्दुल रशीद अब्दुल हमीद देशमुख, सुवेद अब्दुल रशीद देशमुख (दोघ रा. देशमुख वाडा, पाचोरा) व यशवंत खंडू बारी (रा. गणपती नगर,जळगाव), फकीर शरिफ भिकन शहा (रा. राणीचे बांबरुड, ता. पाचोरा) यांना विक्री केली.
कर्जदारांशी संगनमत करणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कंपनीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. मात्र ९० दिवसात त्यांच्याकडून कुठलेही उत्तर न मिळाल्याने तक्रारदाराने न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने दि. २१ फेब्रुवारी तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीचे संचालक अमित अग्रवाल यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कर्जदार काझी सैय्यद अहमद अली, अमतुल लतीफ काझी, काझी सैय्यद बशीरअली (तिघे रा. नशिराबाद) यांच्यासह सह दुय्यम निबंधक संजय ठाकरे, गजानन दगडू पिंगळे, संजय पुंडलिक नाईक, नशिराबाद तलाठी रुपेश अनिल ठाकूर, नशिराबाद मंडळ अधिकारी आशिष रामचंद्र वाघ तसेच खरेदी करणारे फकीर शरीफ भिकन शहा (रा. राणीचे बांबरुड, ता. पाचोरा), यशवंत खंडू बारी (रा. गणपती नगर), सुवेद अब्दुल रशीद देशमुख, अब्दुल रशीद अब्दुल हमीद देशमुख (दोघे रा. देशमुख वाडा, पाचोरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.