जळगावात चोरी केलेल्या वॉशिंग मशीनची भंगारात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:44 PM2018-09-05T12:44:49+5:302018-09-05T12:45:02+5:30
भंगारच्या व्यापाऱ्यासह चौघांना अटक
जळगाव : एमआयडीसीतील सिध्दीका प्लास्ट या प्लॅस्टीक दाणा तयार करण्याच्या कंपनीतून चोरलेल्या वॉशिंग मशीनची चोरट्यांनी भंगारात साडे सहा हजार रुपयात विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सोनुसिंग रमेश राठोड (वय १९, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव), भोला राकेश बागडे (२०, रा. सुप्रीम कॉलनी), एकनाथ उर्फ राहूल रोहिदास राठोड (१९, रा.रायपूर) व यासीन खान हुसेन खान (४५, रा. सुप्रीम कॉलनी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
यासीन खान हा भंगारचा व्यापारी असून त्याने चोरीचे मशीन विकत घेतले होते. एमआयडीसीत सेक्टर एफ/६९ मध्ये संदीप रघुनाथ सानप (वय ३० रा.मेहरुण, जळगाव) यांनी ही कंपनी एक वर्षापासून भाडे तत्वावर घेतलेली आहे. रविवारी दोन पैकी एक वॉशिंग मशीन गायब झाल्याचे दिसल्याने सानप यांनी सोमवारी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली होती. तपासाधिकारी रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, विजय पाटील, अतुल पाटील, किशोर पाटील, मनोज सुरवाडे व भरत जेठवे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.