सुनिताच्या वेदनेवर सलमानच्या दातृत्त्वाची फुंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 05:14 PM2017-09-09T17:14:36+5:302017-09-09T17:21:21+5:30
अमळनेरातील नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये झाली पोटाची अवघड शस्त्रक्रिया
आॅनलाईन लोकमत
अमळनेर,दि.९ - अमळनेर शहरातील सुनिता रवींद्र महाजन या महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या बिर्इंग ह्युमन या संस्थेतर्फे दहा हजारांची आर्थिक मदत करीत वेदनेवर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला आहे. अमळनेर येथील डॉ.अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाऊंडेशन येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
श्रीराम कॉलनीतील रहिवासी सुनीता रवींद्र महाजन या पोटाच्या विकाराने त्रस्त असल्याने अमळनेर येथील डॉ.अनिल शिंदे यांच्याकडे तपासणीसाठी आल्या होत्या. आजाराचे निदान झाल्यानंतर डॉ.शिंदे यांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यासाठी मोठा खर्च येणार होता. या महिलेच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम आहे. डॉ.शिंदे यांनी महाजन दाम्पत्याला धीर देऊन मदतीची तयारी दर्शविली. अभिनेता सलमान खान यांच्या फाउंडेशनमार्फत गरीब रुग्णांना मदत होत असल्याने त्याठिकाणी प्रस्ताव पाठविण्याचा सल्ला दिला. दोघांच्या संमतीनंतर नर्मदा मेडिकल फाऊंडेशन च्या नावाने सविस्तर प्रस्ताव तयार केला. बिर्इंग ह्युमन या फाऊंडेशन प्रस्ताव पाठविल्यानंतर तो मंजूर होऊन १० हजारांचा धनादेश हॉस्पिटल च्या नावाने प्राप्त झाला. सलमान खानच्या संस्थेने केलेल्या दातृत्त्वामुळे सुनिता महाजन यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान,महिलेसह तिच्या कुटुंबीयांनी अभिनेता सलमान खान व डॉ शिंदे यांचे आभार मानले आहे. यापूर्वी देखील अमळनेर तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील बालकाची सलमान खान यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेत एक लाखांची केली होती. त्यामुळे त्या बालकाला जीवनदान मिळाले होते.