जलसंधारण योजनेतील कार्यकर्त्यांना सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:22 PM2019-06-02T12:22:20+5:302019-06-02T12:22:44+5:30
सध्या जळगाव जिल्ह्यातही बहुतांश भागात भूजलपातळी खूपच खालावली आहे़ दिवसेंदिवस तापमान वाढत आहे़ विंधन विहिरी व बोअरवेल खोल होऊन ...
सध्या जळगाव जिल्ह्यातही बहुतांश भागात भूजलपातळी खूपच खालावली आहे़ दिवसेंदिवस तापमान वाढत आहे़ विंधन विहिरी व बोअरवेल खोल होऊन पाण्याचा फक्त उपसाच करण्याची स्पर्धा सुरू आहे़ तुरळक ठिकाणी जलसंधारणाचे कार्य सुरू असून काही उत्साही कार्यकर्ते धडपड करीत आहे़ सातपुड्याच्या पायथ्याशी अडावद, चिंचोली व आडगाव(मनुदेवी) येथील ग्रामस्थ यंदा सातपुड्यातून येणारे पाणी काही प्रमाणात अडवून जिरविण्याचे कार्य करीत आहे़ यातील चिंचोली व आडगाव येथे १०० ते १५० फूट खोल विहिरींच्या माध्यमातून बागायती क्षेत्र तग धरून होते़ परंतु २०१२, २०१५, २०१८ या दर तीन व वर्षांनी येणाऱ्या दुष्काळामुळे विहिरींचे पाणी तर संपलेच परंतु चारशे ते पाचशे फूट बोअरवेल करूनही पुरेसे पाणी नाही़ चिंचोली येथे अशोक साठे, अनिल साळुंखे, अशोक बेहडे, विकास साळुंखे, अनिल साठे, संजय साळुंखे, विजय पाटील, प्रशांत साठे,निरज बेहडे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून पाणी अडविण्याचे कार्य करीत आहे़
आडगाव येथे मनुदेवी संस्थानाची भरीव आर्थिक मदत तसेच ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करून सातपुड्याच्या पायथ्यापासून पालक नाला ठिकठिकाणी खोल करून छोटे, छोटे डोह करण्याचे कार्य सुरू केले आहे़ या कामात शांताराम पाटील, नितीन पाटील, गोकुळ पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभाग देत आहे़ अडावद हे पंचवीस हजार लोकसंख्येचे गाव पिण्यासाठी पूर्णत: बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून आहे़ गावाच्या वरच्या भागातून जाणाºया हतनुरच्या कालव्याचे पावसाळ्यात पाणी सायफन करून नाल्यांमध्ये थोड्या प्रमाणात पुनर्भरण केले जात होते़ येथेही भूजल पातळी यावर्षी चारशे फुटांवर खाली गेल्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे़ यावर उपाय म्हणून येथील भटू महाजन, प्रेमराज पवार, पी़ आऱ माळी, गौरव कासट, सचिन महाजन यांनी गावात जागृती केली़ तीन नाल्यांमधून गाळ काढून शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपिकताही वाढण्यास मदत झाली़ नाल्यांमध्ये निर्माण झालेल्या खड्ड्यांमध्ये तब्बल तीन कोटी लिटर इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली़ दुष्काळाने बागायती पट्टाही अडचणीत आल्यामुळे लोक स्वयंप्रेरणेने कार्यरत होत आहेत़ आता पाणी अडवणे व जिरवणे या कामी लोकांची मानसिकता तयार होत आहे हे उत्तमच़
-डॉ़ हेमंत पाटील, जळगाव