समतेची बिजे वारकरी संप्रदायाने रुजवलीत -प्रा. संदीप पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:56 AM2019-01-09T00:56:29+5:302019-01-09T00:58:25+5:30
महाराष्ट्रातील विविध जाती -धर्मातील लोकांना सामावून घेण्याची ताकद वारकरी संप्रदायातील संत प्रभावळीने आम्हाला दिली असल्याचे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी चोपडा येथे आयोजीत व्याख्यानात व्यक्त केले.
चोपडा : महाराष्ट्रातील विविध जाती -धर्मातील लोकांना सामावून घेण्याची ताकद वारकरी संप्रदायातील संत प्रभावळीने आम्हाला दिली असल्याचे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालय येथील ‘प्राध्यापक प्रबोधिनी’तर्फे स्व. शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मार्ट हॉल येथे ८ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
‘प्रबोधन चळवळीतील संत साहित्याचे योगदान’ या विषयावर बोलतांना प्रा. पाटील पुढे म्हणाले की, मनुवादी व विषमतावादी व्यवस्थे विरुद्ध बंड करून समताधिष्ठित वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे नामदेव व ज्ञानेश्वर यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. तसेच उत्तर काळात संत तुकोबाराय यांना सुद्धा रात्रंदिन युद्धाच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले. कठीण परिस्थितीतही प्रबोधनाचा दीप संतांनी विझू न देता कीर्तनाच्या रंगी नाचून ज्ञानदीप जगी लावलेत. संत म्हणजे केवळ पोशाखाचे व कर्मकांडाचे स्तोम माजवणे नसून रंजल्या गांजल्याची सेवा करून माणसात देवत्व पाहणे होय. संतांचे कार्य हे चमत्काराच्या स्वरूपात न स्वीकारता तर्काच्या पातळीवर ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ या नुसार स्वीकारावे असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते संजीव सोनवणे, उपप्राचार्य एम.बी. हांडे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य डॉ.के.एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.