संभाजी ब्रिगेड लढविणार विधानसभेच्या १०० जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 04:36 PM2019-06-07T16:36:42+5:302019-06-07T16:37:35+5:30
मुक्ताईनगर : प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांची माहिती
मुक्ताईनगर : संभाजी ब्रिगेड आगामी काळात होणारी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी मुक्ताईनगर येथे बोलताना दिली. ६ जून रोजी मुक्ताईनगर येथे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात किमान शंभर जागा लढवणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित आघाडी व भारतीय जनता पक्ष या सर्वच पक्षांसोबत चर्चेची द्वारे उघडी आहेत. मात्र याच सर्व पक्षांना सक्षम पर्याय म्हणून संभाजी ब्रिगेड उभा राहू शकतो असे त्यांनी सांगितले.
समविचारी पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांशी जागावाटपाबाबत बोलणे होऊ शकते मात्र सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच या संदर्भात चर्चा केले जाऊ शकते असेही भानुसे यांनी सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पेरणीपूर्वी शेतकºयांना एकरी दहा हजार रुपयांची मदत तत्काळ राज्य सरकारने त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडची असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल पाटील, सचिव अमोल पाटील, सचिन पाटील, तालुका अध्यक्ष भागवत दाभाडे, तालुका सचिव नरेश पाटील , किरण महाजन, विश्वजित देशमुख, डॉ.सुभाष बागल, डॉ.केशव हमणे औरंगाबाद उपस्थित होते.