गड-किल्ले संवर्धनाचा आराखडा शासनाला करणार सादर - संभाजी राजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 03:13 PM2019-02-24T15:13:23+5:302019-02-24T15:15:23+5:30
स्वातंत्र्यानंतर ऐतिहासिक वैभव असणाऱ्या गड-किल्ल्यांचे संवर्धन व जतन झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आणि दुर्गप्रेमी म्हणून किल्ल्यांचा वैभवी ठेवा जपण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यासाठी ११ रोजी दुर्ग परिषद घेतली. सरकारच्या प्रतिनिधींसह गड-किल्ले प्रेमींबरोबर बैठक घेऊन संवाद साधला. लवकरच दुर्ग जतन व संवर्धनाचा कृती आराखडा आम्ही शासनाला सादर करणार आहोत. १० किल्ल्यांचा ‘मॉडेल’ विकास करण्यात येणार असून, रायगडच्या विकासासाठी सरकारने ६०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती राज्यसभेचे भाजपा खासदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे भोसले यांनी दिली.
जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : स्वातंत्र्यानंतर ऐतिहासिक वैभव असणाऱ्या गड-किल्ल्यांचे संवर्धन व जतन झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आणि दुर्गप्रेमी म्हणून किल्ल्यांचा वैभवी ठेवा जपण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यासाठी ११ रोजी दुर्ग परिषद घेतली. सरकारच्या प्रतिनिधींसह गड-किल्ले प्रेमींबरोबर बैठक घेऊन संवाद साधला. लवकरच दुर्ग जतन व संवर्धनाचा कृती आराखडा आम्ही शासनाला सादर करणार आहोत. १० किल्ल्यांचा ‘मॉडेल’ विकास करण्यात येणार असून, रायगडच्या विकासासाठी सरकारने ६०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती राज्यसभेचे भाजपा खासदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे भोसले यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना दिली. मुलाखतीत त्यांनी ‘नो पॉलिटीक्स प्लिज’ म्हणत राजकीय भाष्य केले नाही. शिवजयंती सोहळ्यासाठी येथे आले असता त्यांच्याशी बातचित झाली.
प्रश्न : गड-किल्ले संवर्धनात दुर्लक्ष झाले, असे तुम्हाला वाटते का ?
उत्तर : हो. ही वस्तुस्थिती असून ती मान्यही केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून गड-किल्ले संवर्धनाची जबाबदारी माझी आहेच. तथापि, महाराजांनी सर्वांसाठी रयतेचे राज्य निर्माण केले होते. त्यामुळे राजकीय पातळीवरही पक्षभेद विसरून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी दुर्ग जतन-संवर्धनात सहभागी व्हावे, असे आवाहनही मी करतोय. स्वातंत्र्यानंतर गड-किल्ल्यांकडे लक्ष देणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. आपला वैभवशाली इतिहास सांगणारा ठेवा जपण्यासाठी आपण कमीही पडलो.
प्रश्न : गड-किल्ले संवर्धनाबाबत शासनाची भूमिका काय?
उत्तर : किल्ल्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन व्हावे. यासाठी महाराष्ट्र सरकार सकारात्मक आहे. आम्ही काही किल्ल्यांचा मॉडेल विकास व्हावा, अशी मागणी केली होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद दिला. सद्य:स्थितीत केंद्रीय पुरातत्व अधिपत्याखाली असणाºया १० किल्ल्यांच्या मॉडेल विकासासाठी १०० कोटी रुपये मंजूर आहेत. आमची मागणी एकूण १५ किल्ल्यांची आहे. यासाठी १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल. यात रायगड, शिवनेरी, सिंधूदुर्ग, पन्हाळा, कोल्हापुरजवळील भुईकोट आणि विदर्भातील दोन किल्ल्यांचा समावेश आहे.
प्रश्न : किल्ल्यांच्या संवर्धनात येणाºया अडचणींबद्दल काय सांगाल?
उत्तर : गड-किल्ल्यांच्या संवर्धनात मुख्यत्वे जमिनी नावावर नसणे, केंद्र व राज्य पुरातत्व विभागाचे अधिपत्य, वनविभागाचे जमिनवाद अशा अडचणी आहेत. राज्य सरकारही किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी दरवर्षी २५ कोटी रुपयांचा निधी देते.
प्रश्न : अडचणींवर काही उपाय आहेत का?
उत्तर : निश्चितच आहेत. केंद्रीय पुरातत्व विभागाप्रमाणेच राज्य पुरातत्व विभागाने किल्ल्यांचे मॉडेल संवर्धन करावे. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी किल्ल्यांची मालकी गाव, तालुका व जिल्हा पातळीवर आहे. याठिकाणी जिल्हा नियोजन मंडळाने किल्ल्यांच्या जतन- संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. यासाठी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाºयांकडे मी स्वत: पत्रव्यवहार केला आहे.
प्रश्न : रायगडच्या विकासाबद्दल काय सांगाल?
उत्तर : रायगड ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी आहे. त्यामुळे गडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा सुरू केला. याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज साडेतीनशे वर्षांनंतरही जनतेला शिवाजी महाराज आपले वाटतात. हेच सोहळ्याचे यश आहे. शासनाने रायगड परिसर विकासासाठी ६०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. यात गड परिसरासह रस्ते, मूलभूत सुविधा व परिसरातील ३१ गावांमध्ये सुविधा उभारल्या जात आहे. ८० कोटी रुपये उपलब्धही झाले असून काम सुरू झाले आहे.
प्रश्न : किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा तयार केला आहे का?
उत्तर : यासाठी शासनाच्या प्रतिनिधींसह दुर्गप्रेमींचीही ११ रोजी दुर्ग परिषद घेतली. सर्वांना एकत्रित बसवून गड-किल्ल्यांच्या जतन व संवधार्नासाठी असणाºया सूचना जाणून घेतल्या. याच बैठकीत अडचणींवरही मंथन झाले. लवकरच किल्ल्यांच्या मॉडेल विकासाचा शास्त्रोक्त कृती आराखडा शासनाला आम्ही देणार आहे. दुर्गप्रेमींना शास्त्रीय पद्धतीने गड-किल्ल्यांचे संवर्धन कसे करावे याचे प्रशिक्षणही देण्याचा मानस आहे.
प्रश्न : दिल्लीत शिवजयंती साजरी करण्याचा अनुभव कसा आहे ?
उत्तर : फारच उत्साहवर्धक आणि रोमांचकारी अनुभव आहे. तिथे शिवजयंती साजरे करण्याचे हे दुसरे वर्ष आहे. राजधानीतही शिवजयंतीसाठी १५ हजाराहून अधिक लोक जमतात, हे विशेष म्हणावे लागेल. पहिल्या वर्षी राष्ट्रपतींसह तीनही सेनादलाचे प्रमुखही महाराजांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. अमेरिका, दुबई येथेही शिवजयंती साजरी होत आहे. महाराजांचा वंशज असल्याचा म्हणूनच अभिमान वाटतो.