“देवेंद्रजी आपण उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधानही व्हाल; पण...”; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 08:04 AM2021-12-30T08:04:52+5:302021-12-30T08:06:36+5:30
दिल्लीत एक वेगळीच चर्चा सुरू असून, महाराष्ट्रात काय चालू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय, असे संभाजीराजे म्हणाले.
जळगाव: चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली. मात्र, ती करताना केलेल्या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची ओळख दिल्लीत व इतिहासात वेगळी आहे. पण महाराजांच्या राज्यात मराठा, ओबीसी व अन्य आरक्षणासाठी आपण आपआपसात भांडत आहोत, या प्रश्नांमुळे दिल्लीत खासदारांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू असून, महाराष्ट्रात काय चालू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, असे संभाजीराजे म्हणाले.
देवेंद्रजी आपण उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधानही व्हाल
देवेंद्रजी तुम्ही आता विरोधी पक्षनेते आहात, उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल. पण माझी एक अपेक्षा आहे की, शिवाजी महाराजांचे आचारविचार हे लिखित स्वरुपात सामान्यातल्या सामान्य शिवभक्तापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा संभाजीराजेंनी यावेळी बोलताना व्यक्त केली. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी, परंतु, आता महाराष्ट्राची ओळख जपण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे, असे आवाहन संभाजीराजेंनी केले आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले याबाबत फडणवीसांनी आभार व्यक्त केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि ते खऱ्या अर्थाने युगपुरुष होते, असे देवेंद्र फडणवीसांनी नमूद केले. युगपुरुष म्हणजे, जे सामान्यांना जागृत करून त्यांच्याकडून असामान्य काम करवून घेतात. म्हणूनच अठरा पगड जातींना एकत्र करून त्यांनी रयतेचे राज्य प्रस्थापित केले, असे फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाल्याचेही पाहायला मिळाले.