एकाच कुत्र्याने तोडले ७ मुलांचे लचके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:13 AM2021-01-10T04:13:00+5:302021-01-10T04:13:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांची प्रचंड दहशत असून, वाघनगरातील ओमसाईनगरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकापाठोपाठ एक अशा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांची प्रचंड दहशत असून, वाघनगरातील ओमसाईनगरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकापाठोपाठ एक अशा दोन ते दहा वर्षांपर्यंतच्या सहा मुलांचे लचके तोडले. एका तीन वर्षांच्या मुलाला तर अगदी खाली लोळवून या कुत्र्याने गंभीर जखमी केले आहेत. या सहासह अन्य भागांतील मुलांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी साडेदहा ते दीड वाजेच्या सुमारास हा सर्व थरार सुरू होता.
शहरातील वाघनगर परिसरातील विवेकानंद शाळेच्या पाठीमागील भागात एकामागून एक या घटना घडल्या. या प्रकारानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी ११ वाजेपासून या मुलांना दाखल करण्यासाठी पालकांनी धाव घेतली होती. यातील काही मुलांना इंजेक्शन देऊन दुपारी घरी सोडण्यात आले होते, तर काहींना दाखल करून घेण्यात आले होते.
गेटच्या आत जाऊन घेतला चावा
यातील दोन ते तीन मुले ही घराच्या आवारातच गेटमध्ये असताना या कुत्र्याने आत येऊन या मुलांवर हल्ला केला. यामुळे परिसरात प्रचंड भीती पसरली होती. यात शिव किनगे हा घराजवळच खेळत असताना सकाळी ११ वाजता अचानक या पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढविला. त्याला खाली लोळवून हा कुत्रा त्याचा चावा घेत असताना अचानक आई धावत आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, सर्व मुलांमध्ये या मुलालाच अधिक गंभीर जखमा झालेल्या आहेत. त्याच्या पाठीला, पायाला खोलवर जखमा झाल्या असून, त्याला तीन दिवस रुग्णालयातच दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या मुलांना चावा
विराट किरण पाटील (७), सृष्टी राहुल अहिर ५, अनुष्का हरिश्वर मौर्य ७, आयुष ज्ञानेश्वर सत्रे २,
शिव गजानन किनगे ३, वैभवी नीलेश दंडगव्हाळ ९, तन्मय सुनील डोळस (११, सर्व वाघनगर) यांसह शिवकॉलनीतील हेमंत राजेंद्र सोनवणे (७), समतानगरातील हर्षल विकास सोनवणे (१०) यांनाही मोकाट कुत्र्यांनी जखमी केल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कक्ष सहामध्ये दाखल करण्यात आले आहे.
तिकडे भूतदया अन् जखमा.
या मुलांमधील अनुष्का हरिश्वर मौर्य ही सात वर्षांची बालिका गायीला पोळी खाऊ घालण्यासाठी गेटच्या बाहेर आली होती. तिवढ्यात या कुत्र्याने अचानक तिच्यावर हल्ला चढविला. तिच्या मानेला चावा घेतला आहे. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दररोज सरासरी पंधरा रुग्ण
शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. गेल्या पंधरा दिवसांत दोनशेपेक्षा अधिक लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. यात सरासरी दररोज पंधरा ते वीस जण कुत्र्याने चावा घेतल्याने उपचार घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात येत आहेत. सुदैवाने या ठिकाणी नॉनकोविड यंत्रणा आणि सर्व औषधोपचार सुरळीत असल्याने तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे.
त्या घटनेची आठवण.. स्थिती मात्र तीच
१३ जुलै २०१९ मध्ये कोठारी नगरातील अशोक वाणी यांच्या तोंडाचा पिसाळलेल्या कुत्र्याने लचका तोडला होता. तशाच अवस्थेत ते तब्बल सहा तास विविध रुग्णालये फिरले हाेते. त्यांना कुठेच दाखल करून न घेतल्याने अखेर कोविड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्याची नामुष्की यंत्रणेवर ओढवली होती. अंगावर काटे आणणाऱ्या या प्रकरणानंतरही पाच महिन्यांत प्रशासनाला जाग आली नसून, मोकाट कुत्र्यांची दहशत कायमच आहे.
निर्बीजीकरणही रखडले
महापालिकेने अमरावतीच्या एका एजन्सीकडे मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची जबाबदारी दिली होती. डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत ही मोहीम सुरू होती. मात्र, नंतर ही प्रक्रिया सुरळीत पार पाडली जात नसल्याने कुत्र्यांचा मृत्यू होत असल्याने ‘पेटा’ने यावर आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर ही प्रक्रियाच बंद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कुठलेही ठोस नियोजन महापालिकेकडे नसल्याचे गंभीर चित्र असून, या सर्व पालकांमधून अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया उमट होत्या.