समतानगरातील बालिकेच्या खून प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 09:12 PM2018-06-17T21:12:12+5:302018-06-17T21:12:12+5:30
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे आश्वासन
जळगाव: समता नगरातील बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून खून केल्याप्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवू तसेच सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम अथवा अन्य चांगले वकील नेमून दोषींना कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्रीदिलीपकांबळेयांनी पीडितेच्या कुटुंबियांना दिले.
रविवारीसकाळी ११.३० च्या सुमारास राज्यमंत्री कांबळे हे समतानगरातील घटनास्थळी पोहोचले. तत्पूर्वी त्यांनी आमदार सुरेश भोळे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, तपासाधिकाऱ्यांशी चर्चा केली. घटनास्थळी पीडित बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेतली.
अरूण चांगरे यांनी पीडित मुलीचे वडिल हे १४ वर्षांपासून शिक्षा भोगत असून त्याची केवळ दीड वर्षांची शिक्षा बाकी आहे. ती माफ व्हावी, पिडीतेच्या आजोबांची वारस म्हणून त्यांच्या सुनेला लाड कमिटीच्या शिफारसीनुसार सरकारी नोकरी मिळावी, तसेच या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, त्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी केली.
सहा दिवसात एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही
मागासवर्गीय समाजातील बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून खून केला जातो, मृतदेह गोणपाटात घालून फेकून दिला जातो, या घटनेची जेवढ्या गांभीर्याने शासनाने व प्रशासनाने दखल घेणे अपेक्षित होते, तशी दखल घेतली गेली नाही. सहा दिवसात एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही. एवढेच काय वाकडी घटनेच्या निमित्ताने जिल्'ात आलेल्या राज्य अनुसुचीत जाती-जमाती आयोग, राज्य बालहक्क आयोग अथवा केंद्र व राज्य शासनाच्या मंत्र्यांनीही या घटनास्थळी भेट देण्याची तसदी घेतली नाही. याबद्दल अरूण चांगरे यांनी नाराजी व्यक्त केली. समतानगरात भेट देणारे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे हे पहिलेच मंत्री असल्याचे सांगितले. तसेच समाजकल्याण विभागावर रोष असल्याचे सांगितले. वाकडी घटनेतील पिडीतांना तातडीने मदत दिली जाते, मात्र या घटनेतील पिडीताही मागासवर्गीय समाजाची असतानाही कुणी फिरकतही नाही? याबद्दल नाराजी व्यक्त केली.
दोषींना कडक शिक्षेसाठी प्रयत्न करू
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, ही घटना दुर्देवी व निषेधार्ह आहे. पोलिसांनी मुख्य संशयिताला ताब्यात घेतले आहे. मात्र त्यास लोकांकडून मारहाण झालेली असल्याने तशा परिस्थितीत कोर्टात सादर केल्यास पोलीस कोठडी मिळणार नाही. त्यामुळे दवाखान्यात दाखल केले आहे. तेथून सुटी मिळाल्यावरच त्यास कोर्टात सादर केले जाईल. तसेच त्याच्यासोबत या गुन्'ात आणखी कोण सहभागी आहेत? त्याची माहिती घेऊन त्यांनाही अटक केली जाईल व कडक शिक्षेसाठी प्रयत्न करु.
महिलांनी अवैध धंद्यांबाबत विचारला राज्यमंत्री व आमदारांना जाब
पीडित कुटुंबाची भेट आटोपल्यावर बाजूलाच झाडाखाली समतानगरातील महिला जमल्या होत्या. त्यांनी राज्यमंत्री कांबळे, आमदार भोळे यांना समतानगरात वाढलेल्या अवैध धंद्यांबाबत जाब विचारला. आम्ही तुम्हाला निवडून दिले. त्यात ५० टक्के महिला आहेत. मात्र लहान बालिका या ठिकाणी नशेखोरी वाढल्याने असुरक्षित झाल्या आहेत. त्यावर काय करणार? असा जाब विचारला.
आॅपरेशन राबवून अवैध धंद्यांवर कारवाईकरा
समतानगरात गांजा, दारू प्राशन करण्याचे तसेच अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुली त्यांची शिकार होत आहेत. या भागात पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर कांबळे यांनी पोलीस चौकी लगेच सुरू करता येणार नाही. मात्र आजपासूनच या भागात पोलीस पॉर्इंट सुरू करून बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले. तसेच पोलिसांनी सर्च आॅपरेशन राबवून अवैध धंद्यांवर कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
भाजपाने घेतलीपीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
राज्यमंत्री कांबळे म्हणाले की, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यास पीडित कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत दिली जाते. मात्र पोलिसांनी मुख्य संशयिताला अद्याप ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल झाल्यास तातडीने मदत दिली जाईल. मुलीच्या वडिलांची शिक्षा दीड वर्ष बाकी आहे. त्यांचा पॅरोल वाढविण्यासाठी तसेच शिक्षा माफ होण्यासाठी प्रयत्न करू. त्यांच्या दोन्ही मुलांच्या १२वीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी आमदार सुरेश भोळे यांनी भाजपाच्यावतीने घेतली असून परिवाराला संरक्षण दिले जाईल, असे सांगितले.
यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरूण चांगरे, आरपीआय महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, दिलीप चांगरे, वसंतराव चांगरे, जितू करोसिया, अॅड.एस.के. कौल,नगरसेवक नितीन बरडे, संजय मोरे, ललित करोसिया, अजय घेंगट, मिलिंद सोनवणे, मेहतर समाज पंचायतचे वसंतराव चांगरे, जगदीश चांगरे, जयप्रकाश चांगरे, बनवारी लिडीया, जितेंद्र बागरे, सुरेश चांगरे, कमलेश चांगरे, ज्योती निंभोरे, सरिता माळी, दिलीप माहेश्वरी, प्रविण लाखन आदी उपस्थित होते.