जळगाव जिल्ह्यात आणखी ६ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:53 AM2018-12-25T11:53:24+5:302018-12-25T11:54:03+5:30
४४ गावांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
जळगाव : जिल्ह्यात यंदा गंभीर दुष्काळी परिस्थिती असून पाणी टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हिवाळा सुरू असतानाही सध्या ४४ गावांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच जिल्ह्यात ६ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
यंदा जिल्ह्यात सरासरीच्या जेमतेम ६८ टक्के पाऊस झाला असून गत १५ वर्षांतील गंभीर दुष्काळ पडला आहे. जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके यापूर्वीच गंभीर दुष्काळी तालुके म्हणून जाहीर झाले आहेत. तर अन्य दोन तालुक्यांमधील काही मंडळ ही दुष्काळी घोषीत करण्यात आले होते. मात्र या दोन तालुक्यांसह सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने या दोन तालुक्यांचाही दुष्काळी जाहीर करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
७१ विहिरींचे अधिग्रहण
डिसेंबर महिन्यातच पाणीटंचाई भेडसावू लागली असून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत ६९ गावांमध्ये ७१ विहिरींचे अधिग्रहण जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्यात अमळनेर तालुक्यातील १७ गावे असून त्यापाठोपाठ मुक्ताईनगर १६ गावे, जळगाव १, जामनेर १, धरणगाव ८, एरंडोल ५, भुसावळ ७, बोदवड १, चाळीसगाव ५, भडगाव २, पारोळा ५ तर चोपडा तालुक्यातील १ गावाचा समावेश आहे.
६ पाणी योजनांना मंजुरी
पाणीटंचाई भेडसावत असलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात ६ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यात जळगाव तालुक्यातील जवखेडा, भडगाव तालुक्यात कजगाव, धोत्रे, बात्सर, पथराड व जामनेर तालुक्यातील पाळधी या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी पाळधीच्या पाणी योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे. तर उर्वरीत तात्पुरत्या पाणी योजनांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे.
४४ गावांना टँकरने पाणीपुरवठा
मागील वर्षीच्या उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर या वर्षी पावसाळा सुरू झाला तरीही बंद होऊ शकले नव्हते. अमळनेर तालुक्यातील काही गावांना टँकर सुरूच ठेवावे लागले होते. यंदाही पुरेसा पाऊस न झाल्याने सध्या हिवाळा सुरू असतानाही जिल्ह्यातील तब्बल ४४ गावांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात अमळनेर तालुक्यातच सर्वाधिक ३० गावांना १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. याखेरीज जळगाव तालुक्यातील १, भुसावळ तालुक्यातील २, मुक्ताईनगर तालुक्यातील १, चाळीसगाव ८, तर पारोळा तालुक्यातील २ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.