अभयारणे, जलाशये, वने, नद्या याकडे लक्ष देणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:50+5:302021-06-05T04:12:50+5:30
संकेत पाटील खिर्डी, ता. रावेर : जळगाव जिल्ह्यातील पर्यावरणात गेल्या पाच वर्षात मोठा बदल झाला असून, जिल्ह्यातील अभयारणे, ...
संकेत पाटील
खिर्डी, ता. रावेर : जळगाव जिल्ह्यातील पर्यावरणात गेल्या पाच वर्षात मोठा बदल झाला असून, जिल्ह्यातील अभयारणे, जलाशये, वने, नद्या याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावल अभयारण्यात वणवे रोजच लागत असतात; मात्र प्रशासनाच्या हाती राखच लागत असते. परिणामी जीवसृष्टीची मोठी हानी नाकारता येत नाही. मात्र उपाययोजना कागदावरच खऱ्या ठरत आहेत.
जलाशये समृद्धीबरोबरच जैवविविधतेने नटली असली तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कोणतीही माहिती वा अभ्यास प्रशासन करत नाही. हतनूर जलाशयाला राज्यात रामसर दर्जा मिळवण्यासाठी अनेक जिल्ह्यातील अभ्यासक येथे हजेरी लावत असतात, मात्र जिल्ह्यातील प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
नदी-नाल्यांचे संवर्धन करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. जलसाठा कमी होऊ नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
२०१५-१६
१. जंगलातील वणवे कमी प्रमाणात होते.
२. जलाशयावर जैवविविधता व पक्षी, प्राणी संपत्ती वाढली होती.
३. जलसाठा हा जमिनीत मुरला जात होता.
२०२०-२१
१. या काळात जंगले वाळवंट होण्याच्या मार्गावर आहेत.
२. जलाशये जैवविविधतेने नटले असले तरी दुर्मीळ पक्षी कमी झाले आहेत.
३. जमिनीवर रासायनिक प्रभाव पडल्याने जलसाठा कमी प्रमाणात मुरत आहे.
ऑक्सिजन पार्क काळाची गरज
जिल्ह्यात हवा, पाणी आणि वृक्षसंवर्धनासाठी ऑक्सिजन पार्क काळाची गरज ठरत आहे. जिल्ह्यांमध्ये प्रत्येक गावात ऑक्सिजन पार्क होणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने ऑक्सिजन पार्कमध्ये देशी भारतीय वनस्पतींची लागवड त्यामध्ये पिंपळ, आंबा, उंबर, लिंब, साग यांसारखी अनेक वनस्पतींची रोपे लावून विविध फुलझाडे, आयुर्वेदिक वनस्पती, परसबागेतील झाडे असे मिळून ऑक्सिजन पार्क बनवणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावात पर्यावरण समतोल त्याचप्रमाणे शुद्ध हवा देण्याचं काम करत असते. याचा फायदा गावाच्या जैवविविधतेसाठी पशुपक्षी यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात होत असतो.
जिल्ह्यातील ऑक्सिजन पार्कला आता ऑक्सिजनची गरज भासत आहे. कारण त्यात लावलेल्या झाडांच्या संगोपनाची गरज असते, तेव्हाच ऑक्सिजन पार्क आपल्यासाठी फायदेशीर आहे. काही ऑक्सिजन पार्क फक्त कागदोपत्री असल्याने हवेतच बरी आहे.
वर्षभरातील पर्यावरणात झालेला बदल हा मानवीय आरोग्याला त्रासदायक ठरला आहे. दमा, अस्थमा आजाराला अनेक रुग्णांना समोर जावे लागलेय. वर्षभरात फक्त भारतातच नाही तर जगभरात विविध ठिकाणांहून अनेक घटना समोर आल्या. हिमाचल प्रदेशमधील ग्लेशियर फुटणे तर पश्चिमेकडे अंटार्टिकाचा मोठा हिमखंड तुटून वेगळा होणे आणि अशा कित्येक घटना आहेत. पर्यावरणाकडे आणि निसर्गाकडे एकंदर दुर्लक्ष होत असल्याने समोर येणारी ही लक्षणं आहेत म्हणून या वेळेस पारिस्थितिक पुनर बहाली म्हणजेच एन्व्हायरमेंटल रिस्टोरेशन ही थीम राबविण्याचा मानस आहे.
लॉकडाऊन आधी हवामानातील बदल
लॉकडाऊन आधी एअर क्वॉलिटी इंडेक्स ही १८० पॉइंटच्या मध्ये होती. मात्र लॉकडाऊननंतर यात जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी घटदेखील झाली होती. यामुळे हवेतील प्रदूषण नक्कीच कमी झालेले होते.
लॉकडाऊननंतर...
‘अनलॉक’नंतर पुन्हा एअर क्वाॅलिटी इंडेक्स म्हणजेच हवेतील प्रदूषणाचा स्तर हा १०० ते १६० पॉइंटच्या मध्ये येण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे ३५ ते ६० दरम्यान जास्त स्तर ठीक मानला जातो; पण साठपासून शंभरपर्यंत हा प्रदूषणाचा स्तर जास्त झाल्याचे संकेत देतो. मात्र जेव्हा शंभरावर आणि दोनशेच्या आसपास जातो तेव्हा तर गंभीर मानला जातो.
प्रतिक्रिया
लॉकडाऊन आधी एअर क्वाॅलिटी इंडेक्स हा १८० पॉइंटमध्ये होता; मात्र लॉकडाऊननंतर यात ४० ते ५० टक्के घट झाली असून, प्रदूषणाचा स्तर शंभरावर गेल्यावर गंभीर मानला जातो.
- नीलेश गोरे, हवामान अभ्यासक, भुसावळ
छायाचित्रे -. काही दिवसांपूर्वी सातपुड्यात लागलेला वणवा व सातपुड्यातील मनोहरी दृश्य.