वाळूचे डंपर उठले निष्पापांच्या जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:14 AM2021-04-05T04:14:47+5:302021-04-05T04:14:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाळू वाहतूक करणारी वाहने निष्पाप लोकांच्या जिवावर उठले असून, कमी वेळेत जास्त पैसा कमाविण्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वाळू वाहतूक करणारी वाहने निष्पाप लोकांच्या जिवावर उठले असून, कमी वेळेत जास्त पैसा कमाविण्याच्या नादात अपघाताच्या घटना घडत आहेत. महिनाभरात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने तीन जणांना बळी घेतला आहे. शनिवारी सकाळी एक आणि संध्याकाळी एक असे दोन जीव एकाच दिवशी गेले, तर मागील महिन्यातही दोघांचा बळी गेला होता. विशेष म्हणजे सर्वच अपघात महामार्गावर झाले असून, त्यातील तीन बळी हे इच्छादेवी चौकातच गेले आहेत.
गेल्या महिन्यात ९ मार्च रोजी इच्छादेवी चौकात दुचाकीने कंपनीत जात असताना वाळूच्या डंपरने दिलेल्या धडकेत सिद्धार्थ त्र्यंबक मोरे (५७, रा.सिंधी कॉलनी) हे जागीच ठार होते, तर अक्षय विजय पाटील (३०, रा. शिवमनगर, निमखेडी परिसर) हा तरुण जखमी झाला होता. दहा दिवसांनंतर त्याचीही प्राणज्योत मालवली होती. या घटनेनंतर ३ एप्रिल रोजी पुन्हा इच्छादेवी चौकातच मॉर्निंग वॉकला गेलेल्या ॲड. सतीश शंकर परदेशी यांनाही अज्ञात वाहनानेच चिरडले. घटनास्थळावरील काही लोकांच्या मते ॲड. परदेशी यांनाही वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरनेच धडक दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पुन्हा सायंकाळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ विनोद वेडू चौधरी (४२, रा.कुंभारखेडा, ता.रावेर) यांच्याही दुचाकीला वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिली. त्यात त्यांचा जीव गेला. या घटनेतील हिरव्या रंगाचे डंपर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याच डंपरने आणखी एका दुचाकीला धडक दिल्याचे सांगितले जात आहे. त्यातही दोन जण जखमी झाले आहेत. वर्षभरात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धडकेत ६० च्या वर निष्पाप लोकांचा जीव जात आहे. ९ मार्चच्या अपघातात तर १८ वर्षांच्या मुलाच्या हाती डंपरचे स्टेअरिंग दिल्याचे उघड झाले होते, ते कायद्याने चुकीचे असल्याचे आरटीओंनीच मान्य केले होते.
कमी वेळेत जास्त खेपा अन् त्यातच धोका
वाळू माफियांकडून कमी वेळेत जास्त खेपा टाकण्याचे चालकाने सांगितले जात आहे. त्यात चालकांना दोन पैसे जास्तीचे मिळतात. त्यामुळे डंपर चालक रस्त्यावर कोणाचीही तमा न बाळगता सुसाट वेगाने डंपर चालवतात, त्यात अशा प्रकारे अपघात होऊन निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. भरदिवसा महामार्गावरून वाळूचे डंपर वापरत असताना त्यांना ना पोलिसांकडून अडविले जाते ना महसूल व आरटीओकडून. या यंत्रणेच्या डोळ्यादेखत ही वाहतूक होत असताना त्याकडे डोळेझाक केली जाते. ग्रामीण भागातून आलेल्या दुचाकी, चारचाकीची पोलिसांकडून तपासणी केली जाते, तर दिवसाला चार-पाचशे रुपये कमाविणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करून आरटीओकडून मर्दूमकी दाखविली जाते. मात्र, वाळूच्या ओव्हरलोड वाहनांकडे कानाडोळा केला जातो.
वर्षभरात ५१२ वाहनधारकांवर कारवाई
आरटीओच्या वायुवेग पथकाने चालू आर्थिक वर्षात ५१२ ओव्हरलोड वाहनांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून १ कोटी ७० लाखांचा दंड वसूल केला आहे. त्याशिवाय चेकपोस्टवर ४८२ वाहनांवर कारवाई करून तेथेही ६५ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी ‘लोकमत’ला दिली.
असे आहेत वाळू वाहतुकीच्या वाहनामुळे झालेले बळी
९ मार्च : सिद्धार्थ त्र्यंबक मोरे (वय ५७, सिंधी कॉलनी)
१९ मार्च : अक्षय विजय पाटील (वय ३०, रा. शिवमनगर)
३ एप्रिल : ॲड. सतीश शंकर परदेशी (४३, रा. शिवाजीनगर)
३ एप्रिल : विनोद वेडू चौधरी (४२, रा.कुंभारखेडा, ता. रावेर).