महसूलच्या महिनाभराच्या दिखाव्यानंतर गिरणेतून पुन्हा वाळू उपसा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:13 AM2021-01-14T04:13:43+5:302021-01-14T04:13:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गिरणा नदीपात्रात पुन्हा अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू झाला आहे. ‘लोकमत’ने वाळू उपशाचा प्रश्न लावून ...

Sand extraction from the mill resumes after a month-long display of revenue | महसूलच्या महिनाभराच्या दिखाव्यानंतर गिरणेतून पुन्हा वाळू उपसा सुरू

महसूलच्या महिनाभराच्या दिखाव्यानंतर गिरणेतून पुन्हा वाळू उपसा सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गिरणा नदीपात्रात पुन्हा अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू झाला आहे. ‘लोकमत’ने वाळू उपशाचा प्रश्न लावून धरल्यानंतर महसूल प्रशासनाने गिरणा नदीत जाणाऱ्या मार्गांवर महसूलच्या पथके तैनात केली होती. मात्र, महिनाभरात महसूलची पथकेदेखील आता केवळ १५ मिनिटे गिरणा पात्रात हजेरी लावायला येत आहेत. विशेष म्हणजे ही पथके गिरणा पात्रात येत असताना पात्रात सर्रासपणे उपसा सुरू असतानाही पथकाकडून कोणतीही कारवाई वाळू उपसा करणाऱ्यांवर होताना दिसून येत नाही. त्यामुळे महसूलची यंत्रणादेखील कुचकामी ठरताना दिसून येत आहे.

‘लोकमत’कडून गिरणा नदीपात्रातील वाळू उपशाच्या विरोधात कडक भूमिका घेतली असून, गेल्या महिनाभरापासून ‘लोकमत’च्या वृत्तानंतर अवैध वाळू उपस्यावर काही प्रमाणात लगाम लागली होती. मात्र, आता पुन्हा महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गिरणा पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू झाला आहे. आव्हाणे, निमखेडी, बांभोरी, आव्हाणी या गावांमधील पात्रातून हा उपसा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने अद्याप या भागातील वाळूचा ठेका दिलेला नाही. निमखेडी शिवारातील ठेका दिला असला तरी ठिय्यावरून वाळू उचलण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या ठिय्यासोबतच गिरणा पात्रातून उपसा सुरू असल्याचे नदीपात्रात दिसून येत आहे.

भरदिवसा उपसा

गिरणा पात्रात रात्रभर सुमारे १०० हून अधिक ट्रॅक्टर व डंपरव्दारे उपसा सुरू असतो. एवढेच काय तर भरदिवसादेखील वाळूचा उपसा सुरू आहे. ‘लोकमत’ ने सकाळी १० वाजताच्या सुमारास गिरणा पात्रात पाहणी केली असता, त्या ठिकाणी १० ते १५ ट्रॅक्टरव्दारे उपसा सुरू असल्याचे आढळून आले.

नदीपात्रात लागला खडक

आव्हाणे परिसरात असलेल्या गिरणा नदीपात्रात गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाला आहे. यामुळे या भागात आता वाळूचे प्रमाण कमी होत असून, अनेक भागात तर आता खडक लागला आहे. तसेच काही भागात वेडी बाभूळ या वनस्पतीने नदीपात्र काबीज केले आहे. याच प्रमाणात जर वाळू उपसा राहिला तर आव्हाणे, आव्हाणी व भोकणी परिसरातील गिरणा नदीपात्रात केवळ खडक व वेडी बाभूळचेच अस्तित्व कायम होईल. यामुळे भूजल पातळीतदेखील घट होण्याची भीती आहे.

तापी नदीपात्रातूनदेखील उपसा सुरू

गिरणा पात्रातील वाळू उपशावर मध्यंतरी काही प्रमाणात महसूल प्रशासनाने नियंत्रण आणले होते. त्यामुळे वाळू माफियांनी आपला मोर्चा गिरणा सोडून तापी नदीकडे वळविला होता. विदगाव, रिधुर, शिरागड या भागातील तापी नदीपात्रातदेखील मोठ्या प्रमाणात उपसा सुरू झाला आहे. विदगाव येथील तापी नदीवरील पुलाच्या खालीदेखील मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे.

Web Title: Sand extraction from the mill resumes after a month-long display of revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.