वाळूचा बाजार ‘गरम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:42 PM2019-04-28T12:42:10+5:302019-04-28T12:42:36+5:30
जळगाव : जिल्ह्यातील वाळू गटांपैकी निम्म्याहून अधिक वाळू गटांचे लिलाव झालेले नसले तरी जिल्ह्यात सर्वदूर वाळूंचा सर्रास उपसा सुरू ...
जळगाव : जिल्ह्यातील वाळू गटांपैकी निम्म्याहून अधिक वाळू गटांचे लिलाव झालेले नसले तरी जिल्ह्यात सर्वदूर वाळूंचा सर्रास उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. ज्या गटांचा लिलाव झालेला नाही, तेथूही वाळू उपसा होत असण्यासह वाळूवरूनच वादही उद््भवू लागल्याने वाळूचा बाजार चांगलाच तापला आहे.
वाळू निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असला तरी जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक वाळू गटांचे लिलाव अद्यापही झालेले नाही. तीन गट शासकीय राखीव असून केवळ १२ गटांचे लिलाव झाले आहे. १६ गटांचे लिलाव अद्याप होणे बाकी आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात वाळू लिलाव प्रक्रिया होते. मात्र यंदा नागपूर खंडपीठाने वाळू लिलावाबाबत दिलेल्या निर्णयामुळे सुरुवातीला निविदा प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यानंतर पर्यावरण समिती बरखास्त केल्याने पुन्हा ही प्रक्रिया रखडली. अखेर मार्च महिन्यात लिलाव प्रक्रिया सुरू झाली. त्यात तीन गट राखीव ठेवण्यात आले. उर्वरित गटांपैकी केवळ १२ गटांचे लिलाव झाले व १६ गटांचे लिलाव होणे बाकी आहे.
आव्हाणी, ता. धरणगाव, बाभुळगाव, ता. धरणगाव, जामोद, ता. जळगाव हे गट शासकीय राखीव गट म्हणून ठेवण्यात आले आहेत तर सावखेडा, ता. जळगाव, माहिजी, ता. पाचोरा, कुरंगी, ता. पाचोरा, रुंधाटी, ता. अमळनेर, झुटकार, ता. चोपडा, पथराळे, ता. यावल, बेलव्हाळ -१,ता. भुसावळ, बेलव्हाळ - २, ता. भुसावळ, बेलव्हाळ - ३, ता. भुसावळ, जोगलखेडा, भुसावळ, पिंप्राळा, ता. मुक्ताईनगर, भानखेडा, ता. भुसावळ या गटांचे लिलाव झाले आहेत. मात्र थोरगव्हाण, ता. यावल, पिंप्री, ता. यावल, धुरखेडा, ता. रावेर, दोधे, ता. रावेर, वाक, ता. भडगाव, बुधगाव, ता. चोपडा, सावखेडा, ता. अमळनेर, नेहते, ता. रावेर, निंभोरा बु. ता. रावेर, तामसवाडी, ता. पारोळा, नारणे, ता. धरणगाव, वैजनाथ, ता. एरंडोल, नागझिरी, ता. जळगाव, उंदीरखेडे भाग - २, ता. पारोळा, रुंधाटी, भाग - १, ता. अमळनेर, घाडवेल, ता. चोपडा हे गट अद्यापही लिलावाच्या प्रतीक्षेत आहेत.
असे असले तरी वाळू उपसा जोरात सुरू असून आव्हाणे येथे नदीपात्रात तर ट्रॅक्टरची जत्रा भरत असल्याचे दिसून येते. याच वाळूवरून खेडी-कढोली येथे वाद झाल्याने वाळूचे सर्वत्र ‘चटके’ जाणवू लागले आहेत.