जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत वाळूचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:39 PM2019-12-10T12:39:06+5:302019-12-10T12:39:15+5:30
जळगाव : जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे हे प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेलेले असल्याने महसूल यंत्रणेचा वाळू चोरांवरील धाक संपला असून वाळूचोरीला ऊत ...
जळगाव : जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे हे प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेलेले असल्याने महसूल यंत्रणेचा वाळू चोरांवरील धाक संपला असून वाळूचोरीला ऊत आला आहे. तर बांभोरी येथे जप्त करण्यात आलेल्या ३२४ ब्रास वाळूसाठ्याची वाहतूक करण्याचा ठेका दिलेल्या मक्तेदाराला तब्बल २४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र त्यानिमित्ताने प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू माफियांकडून गिरणापात्रातून उघडपणे वाळू चोरी सुरू असल्याचे दिसून येत आहे. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा सुरू आहे.
जिल्ह्यात वाळू ठेक्यांची मुदत ३० सप्टेंबरला संपल्याने वाळू उपसा बंद करण्यात आला आहे. असे असतानाही वाळू चोरी मात्र सर्रास सुरू आहे. महसूल यंत्रणेचे मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. गिरणा नदीतील वाळू बारीक असल्याने तिला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे गिरणातून वाळूचोरीचे प्रमाण अधिक आहे. धरणगाव तालुक्यात बांभोरी येथे अवैध उपसा केलेली ३२४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती. मात्र त्याचा लिलाव १३ लाख ८१ हजारांना करण्यात आला. तसेच ही वाळू वाहतूक करण्यासाठी मक्तेदारास तब्बल २४ दिवसांचा कालावधी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिला आहे. मोठ्या संख्येने वाळूची वाहतूक सुरू आहे. या ठेक्याच्या आडून सर्रास अवैध वाळू उपसा केला जात आहे.