वाळू व्यावसायिकाला पोलिसांकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:17 AM2021-02-13T04:17:29+5:302021-02-13T04:17:29+5:30
जळगाव : वाळू चोरीच्या संशयावरुन वाळू व्यवसाय करणाऱ्या रवींद्र पांडूरंग कुंभार (३५,रा.निमखेडी) या तरुणाला सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा ...
जळगाव : वाळू चोरीच्या संशयावरुन वाळू व्यवसाय करणाऱ्या रवींद्र पांडूरंग कुंभार (३५,रा.निमखेडी) या तरुणाला सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व त्यांच्या पथकाने काठीने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता निमखेडी शिवारात घडली. दरम्यान, यावेळी महिलांनाही पथकातील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली असा आरोप कुंभार कुटुंबियांनी केला आहे. कुमार चिंथा यांनी मात्र आरोप फेटाळून लावला आहे.
जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कुंभार याचा वाळूचा व्यवसाय असून स्वत:चे ट्रॅक्टर आहे. वाळू वाहतूक करण्याच्या सर्व पावत्या आहेत तसेच पथक आले तेव्हा ट्रॅक्टरमध्ये वाळूही नव्हती. मात्र अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याच्या संशयावरुन चिंथा यांनी कुंभार याला मारहाण केली, तसेच पुढे आलेल्या महिलांना पथकातील कर्मचाऱ्यांनी काठीने मारहाण केली. जाब विचारल्याचाही चिंथा यांना राग आला व चोर समजून थेट मारहाण केली. यात दुखापत झाल्याने रवींद्र कुंभार याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर सर्व नातेवाईक जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गेले होते. दरम्यान, यावेळी शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचाही गुन्हा दाखल करण्याचा दम पोलिसांना भरल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.
कोट..
मारहाणीचा आरोप खोटा आहे. संबंधित व्यक्ती ट्रॅक्टरमधील वाळू उपसून पलायन करीत होता. त्यामुळे पथकाने त्याला अडविले. अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. खोटे आरोप करुन पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप केला जात आहे.
- कुमार चिंथा, सहायक पोलीस अधीक्षक