गिरणा नदीपात्रात वाळू वाहतुकदारांचा ‘रात्रीस खेळ चाले’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:15 AM2021-05-10T04:15:31+5:302021-05-10T04:15:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरातील सर्व शासकीय यंत्रणा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कामाला लागली आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरातील सर्व शासकीय यंत्रणा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कामाला लागली आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाळू माफियांचा पथ्यावर पडला आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणे, खेडी, निमखेडी, वडनगरी, फुपनगरी या गावांचा गिरणा पात्रातून मध्यरात्री २ ते सकाळी ६ वाजेदरम्यान शेकडो ब्रास वाळूचा अनधिकृत आणि बेसुमार उपसा सुरू आहे. महसूल प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.
तालुक्यातील गिरणा नदी पात्रातील टाकरखेडा व सावखेडा या भागातील ठेका देण्यात आला असला, तरी इतर भागातील गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. आव्हानी या गावाचा ठेका संबंधित ठेकेदाराने महसूल प्रशासनाकडे सरेंडर केला आहे. हा ठेका सरेंडर झाला असला तरी या ठिकाणी दररोज रात्री २०० हून अधिक डंपर व ट्रॅक्टर द्वारे बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन जळगाव शहर व महामार्गालगत ही वाहतूक सर्रासपणे सुरू असतानाही महसूल प्रशासनाकडून या अवैध वाहतूक इकडे डोळेझाक केली जात आहे.
सुरत रेल्वे पुला खाली देखील प्रचंड उपसा सुरूच
गिरणा नदी पात्रातील भुसावळ सुरत रेल्वे पुलाखाली वाळू उपसा करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. तसेच या ठिकाणी १४४ कलम देखील लागू करण्यात आले आहे. असे असताना देखील दररोज या पुलाखालून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याने, पुलाचे खांब देखील उघडे पडले आहेत. त्यामुळे भविष्यात या पुलाला देखील धोका निर्माण झाला आहे. महसूल प्रशासन केवळ नावालाच ठरत असून, याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.
जेसीबीच्या सहाय्याने थेट पाण्यातूनच केला जातोय उपसा
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गिरणा धरणातून आवर्तन सोडल्यामुळे गिरणा नदी पात्रात पाणी आले होते. नियमानुसार पाण्यातून वाळू उपसा करण्यास बंदी आहे. मात्र तरीही आव्हाणे, खेडी या गावांमधील गिरणा नदीपात्रात नदीला पाणी असतानाही थेट जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी जामनेर, भुसावळ, धुळे, रावेर या तालुक्यांमधील देखील डंपर व ट्रॅक्टर दाखल होत आहेत. शहरातून कानळदा कडे जाणारा रस्ता लगत पहाटे ५ वाजेच्या सुमारास याठिकाणी अक्षरश: डंपरच्या रांगा लागलेल्या असतात असेही चित्र पहावयास मिळत आहे. मात्र सर्रासपणे अनधिकृत उपसा सुरू असताना देखील प्रशासनाची भूमिका संदिग्ध वाटत आहे.
कोट..
सुरत रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करून देखील अद्यापपर्यंत या समस्येकडे व्यवस्थितपणे लक्ष देण्यात आलेले नाही. जिल्ह्याची संपूर्ण यंत्रणा कोरोना च्या उपाययोजनांमध्ये गुंतली असताना दुसरीकडे गिरणा नदीपात्राच्या लचके तोडले जात असताना, जिल्हा प्रशासन मात्र संचित होऊन बसली आहे.
-प्रणील चौधरी, सदस्य, गिरणा बचाव कृती समिती