बांभोरीत खासगी जागेतही आढळली वाळू, दोघांविरुद्ध गुन्हा; ९६ हजारांची ३० ब्रास वाळू जप्त
By विलास.बारी | Published: August 20, 2023 07:14 PM2023-08-20T19:14:23+5:302023-08-20T19:14:34+5:30
वाहनांसह खासगी जागेतील वाळूही काढली शोधून
जळगाव : वाळू उपाशाला आळा घालण्यासाठी शनिवारी धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान वाहने जप्त करण्यासह खासगी जागेत साठवून ठेवण्यात आलेल्या वाळूचा साठाही शोधून काढण्यात आला. यामध्ये दोन ठिकाणी हा साठा आढळून आल्याने जागा मालक भिमराव जंगलू नन्नवरे (रा. बांभोरी) यांच्यासह अन्य एका अज्ञाताविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील गिरणा व तापी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने त्याला आळा बसावा म्हणून पोलिस प्रशासन, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने शनिवार, १९ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजताच तीनही विभागाचे पथक बांभोरी गावात पोहचले व कारवाई सुरू केली होती. या दरम्यान ६७ वाहने जप्त करण्यात आली. या सोबतच गावात खासगी जागेत ज्यांनी वाळू साठवून ठेवली आहे, त्याचा धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी तसेच तलाठ्यांनी शोध घेतला. त्यात गट क्रमांक १० मध्ये भिमराव जंगलू नन्नवरे यांच्या मालकीच्या जागेत वाळू साठा आढळून आला. त्याचा परवाना अथवा इतर कागदपत्रे मात्र त्यांच्याकडे नव्हती. तसेच गट क्रमांक २७ व ३०मध्येदेखील अवैध वाळू साठा आढळून आला. दोन्ही ठिकाणी एकूण ९६ हजार रुपये किंमतीची एकूण ३० ब्रास वाळू आढळून आली. याप्रकरणी बांभोरी येथील तलाठी गजानन देविदास बिंदवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिमराव जंगलू नन्नवरे यांच्यासह अन्य अज्ञातांविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहेत.
या पूर्वीच्या कारवाईत खबरे झाले होते मुख्यालयात जमा
या पूर्वीदेखील तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी वाळू माफियांविरुद्ध मोहीम हाती घेतली होती. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करायची आहे तेथील एकाही अधिकारी कर्मचाऱ्याला याची खबर लागू न देता पोलिस मुख्यालयातून ताफा घेत शिंदे स्वतः मध्यरात्री नदीपात्रात उतरले होते. मध्यरात्री झालेल्या या कारवाईने वाळूमाफीयांचे धाबे दणाणले होते. यावेळी वाळूने भरलेले ट्रॅक्टर, डंपर जप्त करण्यात आले होते. वाळूसह विविध अवैध धंद्यावर कारवाई करताना स्थानिक पोलिसांकडून कारवाईबाबत माहिती लिक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या वेळी मुख्यालयात जमा केले होते.